वृत्तसंस्था / लखनौ
बिहारचे बाहुबली नेते आणि माजी खासदार मोहन आनंद हे स्वतःचे पुत्र चेतन आनंद याच्या विवाहसोहळय़ात सामील होण्यासाठी पॅरोलवर तुरुंगातून बाहेर पडले आहेत. मागील अनेक वर्षांपासून आनंद मोहन हे आयएएस अधिकारी जी. कृष्णैया यांच्या हत्येप्रकरणी शिक्षा भोगत आहेत. माजी खासदाराच्या सुटकेसाठी महाआघाडी सरकारने उचललेल्या पावलाप्रकरणी बसप अध्यक्ष मायावतींनी जोरदार टीका केली आहे.
आनंद मोहनला तुरुंगातून बाहेर काढण्याच्या निर्णयावर बिहार सरकारने पुनर्विचार करावा. आंध्रप्रदेशच्या (आता तेलंगणा) महबूबनगर येथील रहिवासी अन् गरीब दलित समुदायातून आयएएस झालेले अत्यंत प्रामाणिक अधिकारी जी. कृष्णैया यांची आनंद मोहनने क्रूरपणे हत्या केली होती. अशा हत्येच्या गुन्हेगाराची नियम बदलुन तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. गोपालगंजचे तत्कालीन जिल्हाधिकारी कृष्णैया यांच्या हत्येप्रकरणी नितीश कुमारांनी दलितविरोधी गुन्हेगाराची मुक्तता केल्याने देशभरातील दलित समुदायात मोठा रोष असल्याचे मायावती यांनी म्हटले आहे. तुरुंगातून बाहेर पडल्यावर आनंद मोहनने 20 एप्रिल रोजी स्वतःच्या कनिष्ठ पुत्राचा वाढदिवस साजरा केला होता. आनंद मोहनचे पुत्र चेतन आनंद हे सध्या राजदचे आमदार आहेत. आनंद मोहन यांना दोन महिन्यांपूर्वी मुलीच्या विवाहात सामील होण्यासाठी 15 दिवसांचा पॅरोल मिळाला होता.









