यंदाच्या आशिया कपमध्ये दिसणार महिला स्पोर्ट्स अँकरचा जलवा : पाकिस्तानच्या झैनाब अब्बासदेखील समावेश
वृत्तसंस्था/ लंडन
गेल्या काही वर्षापासून क्रिकेटला ‘ग्लॅमर’चा तडका देण्याचे काम महिला स्पोर्ट्स अँकर करत आहेत. यामुळे दिवसेंदिवस क्रिकेट अधिकच ग्लॅमरस होत चालले आहे. विशेष म्हणजे, टी-20 क्रिकेटमधील ‘आयपीएल‘ची लोकप्रियता वाढवण्यात देखील या महिला अँकर्सनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. लढतीच्या पहिल्या चेंडूपासून शेवटच्या चेंडूपर्यंत या अँकर्स क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन करतात. विश्वचषक ते आयपीएलमध्ये अनेक मॉडल्स आणि अॅंकर्स प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. अर्थात, पुढील आठवड्यापासून सुरु होणाऱ्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतही अशाच महिला स्पोर्ट्स अँकरचा जलवा पहायला मिळणार आहे. या स्पर्धेत भारताच्या मयंती लँगरसह पाकिस्तानची झैनब अब्बास टीव्ही प्रेझेंटर म्हणून दिसणार आहेत.

प्रसिद्ध भारतीय टीव्ही प्रेझेंटर मयंती लँगर एक अनुभवी टीव्ही प्रेझेंटर आहे. यंदाच्या आशिया कपमध्ये स्टार स्पोर्ट्सवर चाहत्यांना दिसणार आहे. मयंती लँगर ही माजी भारतीय क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नीची पत्नी आहे. मयंती सोशल मीडियावर खूप सक्रिय असून सोशल मीडियावर तिचे मोठ्या प्रमाणात फॉलोवर्स आहेत. याशिवाय, पाकिस्तानी टीव्ही प्रेझेंटर झैनाब अब्बास देखील स्टार स्पोर्ट्सवर अँकरिंग करताना दिसणार आहे. याआधी झैनबने आयसीसी, पीसीबी, स्काय स्पोर्ट्स, सोनी, स्टार स्पोर्ट्ससह अनेक ठिकाणी प्रेझेंटर म्हणून काम केले आहे. इस्लामाबादची रहिवासी असलेली झैनाब यंदाच्या आशिया कपमध्ये आपल्याला दिसणार आहे.

तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर सक्रिय असलेली जैती खेराही यावेळेस टीव्ही प्रेझेंटर म्हणून आपल्याला दिसणार आहे. जैती एक अभिनेत्रीदेखील आहे. याआधी जैतीने आयपीएलमध्येही प्रेझेंटर म्हणून काम केले आहे. जैतीदेखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. जैती अनेकदा तिच्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.









