गुजरातच्या निवडणूका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तशी भाजपची घालमेल वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या गृहराज्यात भाजप सातव्या वेळेला सत्तेत येईल याविषयी पक्षात अजिबात दुमत नाही. ‘मोदी है तो मुमकिन हैं’ ची जादू जर गुजरातमध्ये चालणार नाही तर कोठे चालणार असा खडा सवाल पंतप्रधानांचे समर्थक करतात. अगदी आरामात भाजप परत सत्तेत येणार अशी भाकिते होत असताना मोदी-शहा हे मात्र कोणताच चान्स घ्यायला तयार नाहीत. समान नागरी कायदा बनवण्यासाठी जी समिती गुजरातमध्ये बनवण्यात आलेली आहे ती म्हणजे ध्रुवीकरणाचे हुकुमी हत्यार परत एकदा वापरून आपली सत्ता पक्की करण्याचा डाव खेळला जात आहे याचेच चिन्ह होय.
कोणाला आवडो अथवा नावडो पण गुजरातमध्ये जोपर्यंत एखादा भावनिक मुद्दा प्रचारात आणला जात नाही तोवर भाजप जिंकत नाही असे मानले जाते. गुजरातमध्ये गेली 27 वर्षे भाजपचे राज्य आहे. गेली दोन दशके ते राज्य ‘मोदी लॅन्ड’ म्हणून ओळखले जाते ते पंतप्रधानांनी तिथे आपला जलवा दाखवलेला आहे म्हणून. गुजरातवर आपला शिक्का जमवल्यामुळे ते ‘हिंदू हृदय सम्राट’ झाले. गुजरातमध्ये हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये एक अजब प्रकारची तेढ आहे. त्याला ऐतिहासिक कारणे असतील. अफगाणिस्तानातील गझनीच्या सुलतानाने अकराव्या शतकात गुजरातवर वारंवार हल्ले करून सोरटी सोमनाथचे शिव मंदिर उध्वस्त केले होते. त्यानंतर मुघल साम्राज्य आणि त्यानंतर काही काळ गुजरातवर मुस्लिम सुभेदारांचेच राज्य होते. अशा बऱयाच कारणांमुळे ही तेढ निर्माण झाली असेल. उत्तरप्रदेशात स्वातंत्र्यपूर्व काळात वेगवेगळय़ा संस्थानिकांच्या रूपात मुस्लिम सुभेदारच राज्यकर्ते असल्याने तिथेदेखील हिंदुत्वाच्या बीजाने झटकन आकार घेतला. लालकृष्ण अडवाणी यांच्या सोमनाथ ते अयोध्या रथयात्रेने देशाचे राजकारण पलटवले. त्याचा सर्वात जास्त प्रभाव गुजरात आणि उत्तर प्रदेशात झाला. एकीकडे मंडलचा मुद्दा पेटला असताना दुसरीकडे कमंडलचा मुद्दा पेटवला गेला आणि त्या वातावरणात काँग्रेस एक प्रकारे स्वाहा झाली. गमतीची गोष्ट अशी की त्यातूनही वेगळा मार्ग काढत केंद्रात सत्तावाटपाचा मार्ग स्वीकारून काँग्रेस नवी दिल्लीत दहा वर्षे सत्तेत राहिली.

गुजरातमधील निवडणुकीपूर्वी भाजपने ध्रुवीकरणाचे कार्ड नेहमी खेळलेले आहे. 2002च्या निवडणुकीपूर्वी गुजरातमध्ये काँग्रेस सत्तेत येईल अशी स्पष्ट चिन्हे होती. तेव्हढय़ात गोध्रा येथे अयोध्येहून परतत असलेल्या कारसेवकांच्या रेल्वे डब्याला आग आणि त्यातून उडालेला प्रक्षोभ व झालेली हिंसा याने वातावरणच पूर्ण बदलले आणि भाजप मोठय़ा बहुमताने परत सत्तेत आली. मोदी मुख्यमंत्री झाल्यावरील ही पहिली निवडणूक होय. त्यानंतर मोदींची पकड जास्तच वाढली. मोदी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतरदेखील प्रत्येक निवडणुकीत धार्मिक
ध्रुवीकरणाचा मुद्दा पुढे करून भाजपने आपल्या पोळीवर तूप ओढून घेतलेले आहे. पाकिस्तानात जनरल परवेझ मुशर्रफ यांचे शासन होते तेव्हा मोदींनी ‘मियाँ मुशर्रफ’ असा मुद्दा बनवला. क्रिकेटच्या मॅचमध्ये पाकिस्तान जिंकतो तेव्हा काहीजण फटाके फोडतात असा प्रचार केला. ‘हम पाच, हमारे पच्चीस’ असा मुद्दा एका निवडणुकीत बनवून मुस्लिम समाज फार जबर वाढत आहे असे वातावरण बनवले. एका निवडणुकीत फार कडक आणि कर्तव्यतत्पर मानल्या गेलेल्या तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्ताला त्याच्या नावाने (जेम्स मायकेल लिंगडोह) असे वारंवार उच्चारुन अल्पसंख्याकांच्या विरोधात हवा तयार केली.
किती बरोबर अथवा चूक हे ज्याचे त्याने ठरवावे. पण समान नागरी कायदा आणणार अशा प्रकारचे वातावरण करून मुस्लिम समाजाला डिवचण्याचे काम केले जात आहे असे मानले जाते. असा कायदा हा घटनाविरोधी तसेच अल्पसंख्यक समाजाच्या विरोधी आहे, असा मुस्लिम संघटनांचा दावा आहे. जगातील बऱयाच देशात असा कायदा असताना भारतातच त्याला विरोध का? असा सवाल अशा कायद्याचे समर्थक विचारतात.
गुजरातमधील या निवडणुकीपूर्वी तिथे झंझावाती प्रचार करून भाजपला घाम आणणारे आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी समान नागरी कायदा आणायला आपला पाठिंबा आहे असे जाहीर करून भाजपची हिंदुत्वाची मतपेढी फोडण्याचे काम चालवले आहे. असा कायदा आणायचे भाजप केवळ नाटक करत आहे, असा केजरीवाल यांचा आरोप आहे. असा कायदा बनवायचा असेल तर सर्व समाजांना सोबत घेतले पाहिजे अशी मल्लिनाथी करत आपण गैरहिंदू समाजांविरुद्ध नाही असेही भासवत आहेत. ‘निवडणुकीत मते लाटण्यासाठी हा कायदा बनवण्यासाठी समिती भाजपने जाहीर केलेली आहे. एकदा का निवडणूक पार पडली की ही समिती गुंडाळण्यात येईल. उत्तराखंडमधील निवडणुकीच्या अगोदर भाजपने तिथेदेखील अशी समिती जाहीर केली होती आणि निवडणूक झाल्यावर त्या समितीचा गाशा गुंडाळला गेला’ असा त्यांचा दावा आहे. गमतीची गोष्ट अशी की सहा ते सात कोटीच्या दरम्यान लोकसंख्या असलेल्या गुजरातमध्ये मुस्लिम समाज दहा टक्केदेखील नाही.
स्वतःला हनुमानभक्त म्हणवणारे केजरीवाल यांनी भाजपच्या हिंदुत्वाला काटशह देण्यासाठीच गेल्या आठवडय़ात एक अजब सूचना केली होती. चलनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीची चित्रे छापली तर भारतीय अर्थव्यवस्था सुधारेल आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कोसळत चाललेला रुपया आपोआप वधारेल, असे त्यांनी सूचित केले होते. गेली आठ वर्षे मोदी पंतप्रधान असूनही आर्थिकदृष्टय़ा देश कमकुवत राहिलेला आहे, असा त्यांचा अलिखित संदेश होता. लक्ष्मीचा पूजक असलेला गुजरातमधील उद्योजकवर्ग आपल्याकडे वळवण्यासाठी केजरीवाल प्रयत्नशील आहेत. केजरीवाल यांचे सोयीस्कर हिंदुत्व गुजराती लोकांना कितपत परवडेल हे येत्या काळात दिसेल. हिंदुत्वाच्या राजकारणात ठकाला महाठक भेटला आहे की काय हे निवडणुकीचा निकाल लागल्यावर कळणार आहे. आपने सध्या गुजरातमध्ये हवा बनवलेली आहे हे मात्र
खरे.
केजरीवाल यांच्या पक्षाच्या गुजरात प्रवेशामुळे भाजपविरोधी पक्षांची मते विभागली जातील आणि अलगद सत्ता परत आपल्या हातात येईल, असा मोदी-शहा यांचा सरळ हिशोब आहे आणि तो फारसा चुकीचा नाही. गुजरातमध्ये प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला ‘मुसलमानांची पार्टी’ असे सतत हिणवून भाजपने त्याला बऱयाच प्रमाणात राजकीयदृष्टय़ा खच्ची करण्याचे काम केलेले आहे.
या अशा प्रयोगांमुळेच गुजरात म्हणजे भाजपची ‘हिंदुत्वाची प्रयोगशाळा’ म्हणून नावारूपाला आली. असे असले तरी काँग्रेसला जवळजवळ 30 टक्के मते मिळत आलेली आहेत. गुजरातच्या ग्रामीण आणि आदिवासी भागात काँग्रेसला असलेला पाठिंबा कमी करणे भाजपला गेल्या 30 वर्षात जमलेले नाही. भारत जोडो यात्रेला दक्षिणेत मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाने उत्साहित झालेली काँग्रेस गुजरातच्या पाच भागात, पाच यात्रा काढून जागृती करत आहे. गुजरातमधील मुद्दे हे बेकारी, महागाई आणि भ्रष्ट कारभार असे आहेत असे काँग्रेसला वाटते. गेल्या निवडणुकीत 182-सदस्यीय विधानसभेत 99 जागांवर भाजपला रोखण्यात राहुलना यश आले होते.
अशावेळी मोरबीला झालेल्या झुलत्या पुलाच्या अपघाताने भाजपपुढे अनपेक्षित संकट उभे राहिले आहे. पंतप्रधानांनी सत्वर घटनास्थळी भेट देऊन डागडुजी करण्याचा प्रयत्न जरूर चालवला आहे. पण सत्ताधारी वर्ग या अचानक आलेल्या आपत्तीमुळे धास्तावलेला आहे हे मात्र खरे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या राजीनाम्याची मागणी करुन केजरीवाल यांनी हा विषय तापवण्याचे ठरवलेले आहे असे दिसतेय. ‘मोदी है तो मुमकिन है’ असे मानणारे भाजपाई पंतप्रधान परत एकदा ‘संकटमोचक’ होतील यावर विश्वास ठेवून आहेत. घोडामैदान जवळच आहे.
सुनील गाताडे








