देवळात गेल्यानंतर देवाचे दर्शन झाले की देवळाच्या पायरीवर थोडा वेळ टेकून नंतर बाहेर पडायचे असा प्रघात आता उपचार झाला आहे. त्यामागील उदात्त भावना लोप पावली आहे. देवाचे दर्शन हे डोळ्यातून मनात साठवायचे आणि चित्तामध्ये स्थिर करायचे. नंतर त्याचे मनन करायचे. देवाचे रूप हृदयी ठसावे म्हणून डोळे मिटून देवळाच्या पायरीवर बसायचे आणि त्या रूपाचे ध्यान करीत पुढे जायचे. देवळातल्या देवाचे दर्शन हे नित्यनूतन असते. रोज नवा पोषाख, अलंकार, फुलांनी सजलेले असते. ते रूप बघून भक्तांना आनंद होतो. जरीकाठी उंची वस्त्रs ल्यालेले देव खूप सुंदर दिसतात. नटलेला देव जसा भक्तांना आवडतो तसा नीटनेटका पोषाख केलेला भक्तदेखील देवाला आवडतो. सत्पुरुष सांगतात की देवळात पहाटे काकडआरतीला जाताना स्नान केले नाही तरी चालते, परंतु विस्कटलेले केस, चुरगळलेली वस्त्रs, पेंगुळलेले नेत्र या वेषामध्ये देवासमोर जाऊ नये. तोंडावरून पाणी घेऊन, केस बांधून, साधी वस्त्रs व्यवस्थित परिधान करून देवापुढे गेलात की भक्ताला बघून देवालाही आनंद होतो.
परमेश्वर विविध रूपांनी नटलेला आहे. खरे म्हणजे तो निर्गुण, निराकार असूनही भक्तांसाठी आकार आणि शृंगार धारण करतो. भक्तांना त्याचे सगुण रूप भावते. ध्यान करता येते. संत गोरा कुंभार पांडुरंगाला म्हणतात, ‘तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम’.. प्रपंचात विहित कर्मे करणे अपरिहार्य आहे. ते कर्म करीत असताना ‘तुला आठवावे गावे, हाच एक नेम’ असू द्यावा. मनात एकदा इष्ट देवतेचे रूप ठसले की ते त्याच्या पोषाखासह चित्तचक्षूंना दिसू लागते. संत तुकाराम महाराजांना विठुरायाचे ‘सुंदर ते ध्यान’ आवडते. गळ्यात तुळशीहार, कासे पितांबर. विठुराया त्रिभुवननायक, लक्ष्मीपती म्हणून तळपणारी मकरकुंडले, गळ्यात कौस्तुभमणी आहे. संत तुकोबांचे ‘हेचि सर्व सुख’ आहे. डोळ्यांसमोर उभा राहणारा हा मूर्तिमंत पांडुरंग लीलाधारी आहे. प्रसंगी भक्तांच्या संकटी धावून जाताना तो निरनिराळी रूपे धारण करतो. संत नामदेवांनी चोखामेळा यांचे चरित्र लिहिले आहे. संत चोखामेळा यांच्या पत्नी सोयराबाईंचा प्रसूतीकाळ जवळ आला तेव्हा त्यांनी आपल्या पतीला काही साहित्य आणायला सांगून तयारी करायला सांगितली. चोखामेळा विरक्त. हा घोर नको म्हणून विठोबाचे नाम घेत ते बहिणीच्या गावाला गेले. इकडे सोयराबाई अस्वस्थ झाल्या. पती गेले कुठे? त्या पांडुरंगाला म्हणाल्या, ‘अहो पांडुरंगा आणा आता त्यासी, न सांगे मी वार्ता संसाराची’. ही विनवणी ऐकून विठाई धावली. कशी? तर ‘चोखोबाची बहीण झाला सारंगधर, वहिनी उघडा दार, हाका मारी’.. चोखामेळ्याची बहीण निर्मळा हिचा वेष घेऊन पांडुरंग हजर झाला. नंतर यथासांग बाळंतपण करून जायला निघालेल्या निर्मळाच्या वेषातला पांडुरंग सोयराबाईंना म्हणाला, ‘दादाचे वचन तू मान्य करीत जा. त्यातच तुझे कल्याण आहे. तो पांडुरंगभक्त आहे.’ चोखामेळ्याला जेव्हा हे कळले तेव्हा ते सोयराबाईंना म्हणाले, ‘धन्य तुझे भाग्य, भेटी झाली.’ संत नामदेव महाराज म्हणतात, ‘भक्तांसी संकट, पडो नेदी देव.’
श्रीकृष्णाची भेट व्हावी म्हणून राधेने व्रत केले. श्रीकृष्णालाही राधेला भेटायचे होते, परंतु तो राधेच्या महालात येणार कसा? राधेचे पिता वृषभानूंनी राधेच्या महालात कुणाही पुरुषाने प्रवेश करू नये म्हणून सक्त पहारा ठेवला होता. श्रीकृष्ण चंद्रावली नावाच्या राधेच्या सखीकडे गेले आणि म्हणाले, ‘आज मला सखीच्या वेषाने आणि शृंगाराने तुझ्यासारखे सजवून दे.’ चंद्रावलीने हुबेहूब सखीचा पेहराव आणि शृंगार कृष्णाला करून दिला. श्रीकृष्ण सखीवेषात राधेकडे गेले. वृषभानू दाराशीच बसले होते. परंतु स्त्राrवेषातील कृष्णाला त्यांनी ओळखलेच नाही. त्यांना वाटले ही राधेचीच मैत्रीण आहे. अशा रीतीने श्रीकृष्ण राधेला भेटले.
पू. डोंगरे महाराज म्हणतात, ‘भगवंत साडी नेसतात तेव्हा तुम्ही त्यांना आई म्हणता; मात्र परमात्मा तत्वत: एकच आहे. देवता अनेक आहेत, परमात्मा एकच आहे. एखादा मनुष्य दिवसभरात अनेक पोषाख बदलत असतो. घरातला, बाहेरचा, कार्यालयातला पोषाख त्याचा वेगवेगळा असतो. पोषाख बदलल्याने व्यक्ती बदलते का? अर्थात व्यक्ती बदलत नाही. परंतु पोषाखामुळे त्याचे चित्त नक्की बदलते, पोषाखामुळे अंतरंगात बदल होतो. सणसमारंभ, पूजा, मंगलकार्य असले की अलंकारयुक्त पोषाख परिधान केला की मन कसे प्रसन्नतेने व सात्विकतेने भरून जाते! मनात पावित्र्य निर्माण होते. राम-रावण युद्धप्रसंगी कुंभकर्णाला जागे केले असता त्याने विचारले की, मला का बरं निद्रेतून उठवले? यावर रावणाने सीताहरणाची गोष्ट सांगितली. कुंभकर्ण म्हणाला, ‘तू नकली राम बनून सीतेपाशी जा. ती तुला वश होईल.’ रावण राक्षस आहे. तो मायावी रूपे धारण करू शकतो. रावण म्हणाला, ‘तो प्रयत्न मी करून बघितला. काय सांगू? मी रामाचा पोषाख घालतो तेव्हा श्रीरामांचे चिंतन माझ्या मनात सुरू होते. रामाचे अनुकरण करताना मनात काम राहत नाही. इतकेच कशाला? मंदोदरीविषयीसुद्धा माझ्या मनात मातृभाव जागा होतो.’ राक्षसाचीही वृत्ती देवपोषाखाने बदलून जाते. आचार्य ओशो रजनीश असे म्हणतात, युद्धावर जायचे असते म्हणून सैनिक घट्ट कपडे घालतात. ते लढायला जोर देतात. मनात वीरभाव जागृत करणारा त्यांचा पोषाख असतो. घरीदारी, कार्यालयात जाताना माणसांनी, स्त्रियांनी घट्ट कपडे का घालायचे? ते निरर्थक आहे. घर म्हणजे काही युद्धस्थळ नव्हे. जेव्हा प्रेमाने, शांततेने जगायचे असते तेव्हा सैलसर साधाच पोषाख घालावा.
ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकरांनी एक अद्भुत गोष्ट ‘देवाचिये द्वारी’ या ग्रंथामध्ये सांगितली आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतल्यानंतर पंधरा वर्षातच अल्लाउद्दीन खिलजीचा वजीर मलिक काफर हा महाराष्ट्रातील मंदिरे भ्रष्ट करीत सुटला. तीर्थराज आळंदीकडे त्याची नजर गेली तेव्हा सारे सुन्न झाले. भाविकभक्तांनी, गावकऱ्यांनी दिलेले सुवर्णसंपत्तीचे आमिष नाकारून त्याने आळंदीकडे कूच केले तेव्हा शंकरभट जोशी नावाचे एक भक्त पुढे आले. उर्दू-पारसी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. दाढी वाढलेले, डोळ्यांत तेज असलेले त्यांचे रूप ऋषीसारखे होते. प्रसंगावधान राखून त्यांनी मौलवीचा वेश अंगावर चढवला आणि ते मलिक काफरकडे गेले. अस्खलित उर्दू भाषेत त्यांनी माऊलींचे विश्वकल्याणाचे तत्वज्ञान त्याला समजावून सांगितले. ज्ञानोबा माऊली हे कोणत्याही धर्माच्या, वंशाच्या बंधनापलीकडे अखिल विश्वाला कवेत घेण्याइतके कसे विशाल आहेत हे सांगून माऊलींच्या समाधीला धक्का लावणे हे मुसलमान धर्माच्याही कसे विरुद्ध आहे, हे त्यांनी त्याला पटवून दिले. एका मुसलमान मौलवीच्या तोंडून हा माऊलींचा समाधीमहिमा ऐकल्यावर मलिक काफर परत गेला. शंकरभट हे मौलवी नाहीत, ते हिंदू आहेत, अशी जरासुद्धा शंका त्याला आली नाही. वेषांतराने आपली संस्कृती, संपदा रक्षण करणारे जे सत्पुरुष, विभूती होऊन गेले त्यांना प्रणाम.
पुराणात सती मदालसा आख्यान आहे. त्यात आपल्या पुत्राला आत्मज्ञानाचा उपदेश करताना मदालसा म्हणते, ‘हे हाडांच्या खांबावर उभे केलेले, नाड्यांच्या दोरांनी ठिकठिकाणी बांधलेले, रक्ताने लिंपलेले शरीर कुत्र्याकावळ्यांनी लचके तोडू नयेत म्हणून परमेश्वराने कातडीने मढवले आहे.’ आज समाजात कुत्र्या-कावळ्यांची नजर असलेले नराधम मुक्तपणे वावरत आहेत. परमेश्वराने ज्याप्रमाणे कातडीने मढवून आपले रक्तमांसमय शरीर झाकून ठेवले त्याप्रमाणे स्त्राr-पुरुषांनी योग्य पोषाखाने शरीर झाकून ठेवावे, ही काळाची शिकवण आहे
-स्नेहा शिनखेडे








