अध्याय दुसरा
भगवंत म्हणाले, आपली परमेश्वराशी एकरूपता व्हावी अशी सदबुद्धि त्रिगुणांच्या पलीकडे गेलेल्या साधू, संन्यासी, योगी ह्यांच्याठायी विकसित झालेली असते. ईश्वरप्राप्ती करून देणारी बुद्धी ती हीच. फळाची अपेक्षा करणाऱ्यांची बुद्धी ही दुर्बुद्धी समजावी. चांगलं काय, वाईट काय हे न कळणाऱ्या अविवेकी लोकांना कर्मफळाचं महत्त्व वाटत असतं. कर्म करा आणि फळाचा उपभोग घ्या असंच वेदात सांगितलंय असा वेदांचा हवाला देऊन ते वाद घालत असतात. त्याप्रमाणे फळाच्या आशेने कर्म करायला मनुष्य सुरवात करतो पण काही काळाने त्याच्या असे लक्षात येतं की, मिळणारे फळ हे नाश पावणारे असल्याने फळाच्या अपेक्षेने कर्म करण्यापेक्षा निरपेक्षपणे कर्म करणे उचित आहे पण हे न पटणारे पंडित म्हणतात, कर्म करून भोग वैभवाचा उपभोग घ्यावा. अशा लोकांची बुद्धी भोगवैभवात गुंतल्यामुळे समाधीत स्थिर होऊ शकत नाही असे भगवंत पुढील श्लोकात सांगत आहेत,
त्यामुळे भुलली बुद्धि गुंतली भोग वैभवी । ती निश्चय न लाभूनि समाधीत नव्हे स्थिर ।।44।।
माऊली म्हणतात, भगवंतानी अर्जुनाला असे सांगितले की, कर्म करून फळ मिळवावे असा अविचार करणारे लोक स्वर्गसुखाची इच्छा धरतात आणि परमात्म्यालाच विसरतात. ही गोष्ट फार वाईट आहे. हे अविचारी लोक परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी प्रयत्न करायचे सांगायचे सोडून, स्वर्गसुख मिळवा असे लोकांना सांगतात. ज्याप्रमाणे कापराची रास करावी आणि मग तिला आग लाऊन द्यावी किंवा मिष्टान्नात जालीम विष घालावे किंवा दैवयोगाने मिळालेला अमृताचा घडा लाथ मारून पालथा करावा त्याप्रमाणे त्यांचे ऐकणारे लोक आयतीच प्राप्त झालेली स्वधर्म पालनाची संधी फळाचा अभिलाष धरून वाया घालवतात. मोठ्या सायासाने पुण्यकर्म करावे पण फळाची अपेक्षा करू नये हे सद्बुद्धी प्राप्त न झालेल्या अज्ञानी लोकांना समजत नाही. ज्याप्रमाणे एखाद्या सुग्रण स्त्राrने उत्तम पक्वान्ने करून ती केवळ द्रव्याच्या आशेने विकून टाकावीत, त्याप्रमाणे हे अविचारी लोक सुखोपभोगाच्या आशेने हातचा स्वधर्म दवडतात. म्हणून अर्जुना, वेदांच्या अर्थवादामध्ये मग्न झालेल्या लोकांच्या मनात पूर्णपणे ही दुर्बुद्धी वास करत असते हे लक्षात ठेव.
पुढील श्लोकात भगवंत वेदात काय सांगितलंय ते स्पष्ट करताना म्हणाले, अर्जुना, वेद त्रिगुणात्मक संसाराचे प्रतिपादन करणारे आहेत. पण तू त्रिगुणातीत हो, द्वंद्वरहित हो, नित्य सत्वगुणी हो.
तिन्ही गुण वदे वेद त्यात राहे अलिप्त तू । सत्त्व सोडू नको सोशी द्वंद्वे निश्चिंत सावध ।।45।।
श्लोकाच्या विवरणात माऊली म्हणतात, भगवंतानी अर्जुनाला असे सांगितले की, वेदात त्रिगुणांचे वर्णन आहे हे खरे पण त्यामागे उद्दिष्ट असे आहे की, हा संसार त्रिगुणयुक्त आहे आणि त्यापासून जीवाला धोका आहे. हे लक्षात घेऊन माणसाने सावध राहून त्यांच्यापासून अलिप्त व्हावे म्हणजे त्या गुणांचा माणसाने त्याच्या विचारसरणीवर परिणाम होऊ देऊ नये. त्रिगुण हेच माणसाचे मुख्य शत्रू आहेत. म्हणून त्यांच्या सामर्थ्याची पूर्ण ओळख करून घ्यावी. त्रिगुण माणसाला कसे घेरतात आणि त्याची वाट कशी लावतात ते समजून घ्यावे.
हा मुद्दा स्पष्ट करताना माउली म्हणतात, तू असे नि:संशय समज की वेद जरी त्रिगुणांनी व्याप्त असले तरी त्यातील उपनिषदादि जे भाग आहेत ते केवळ सात्विक आहे. स्वर्ग मिळवून देणाऱ्या कर्मादिकांचे ज्यात निरूपण केलेले आहे ते वेदांचे भाग रज व तम या गुणांनी युक्त आहेत. ते सुखदु:खाला कारणीभूत होतात.
क्रमश:









