मीदोन-तीन दिवसांपूर्वीच्या लेखात म्हटले होते की भारतात क्रिकेट खेळणं म्हणजे फलंदाजाने वाहत्या गंगेत हात धुवून घेण्यासारखेच. गोलंदाजाने किती डोकं फोडलं तरी अमावास्या-पौर्णिमासारख्या एखाद-दुसऱ्या विकेटवर समाधान मानायचे. परंतु 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत ज्या पद्धतीने भारतीय पेसर आणि स्पिनर्सनी गोलंदाजी केली आहे, त्यावरून आशिया खंडातील किंवा आशिया खंडाबाहेरील क्रिकेट खेळणाऱ्या संघातील गोलंदाजांना भारतीय गोलंदाजांचं शिष्यत्व स्वीकारलं तर त्यात आश्चर्य वाटू नये.
प्रथम आपण जसप्रीत बुमराहबद्दल बोलू. तब्बल सव्वा वर्षे क्रिकेटपासून दूर राहिला. भारतीय क्रिकेटपटू आपल्या बायकोपासून काही दिवस दूर राहतील पण क्रिकेटशिवाय, नको रे बाबा कल्पना न केलेलीच बरी, असे ते मनोमनी म्हणत असतील. माझ्या मते जसप्रीत बुमराह भारतीय संघात परतणं, हाच मोठा शुभशकुन होता. दिल्लीत रोहितची बॅट तळपत असताना बुमराहने खऱ्या अर्थाने काजवे दाखवले. बुमराहने दुखापतीवर मात तर केलीच, परंतु ज्या पद्धतीने तो आला तो एखाद्या पंचविशीतल्या नवरदेवासारखाच.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुखापतीनंतर संघात येणे म्हणजे एखादा उमेदवार चार ते पाच वेळा एकाच मतदारसंघातून भरघोस मताने निवडून येत असताना त्याच्या विरुद्ध उभे राहून त्याला फाइट करण्याइतकं कठीण असतं. तो परतला इथपर्यंत ठीक आहे, परंतु त्याच्या बाउन्स आणि वेगात काडीमात्र बदल झालेला नाही. त्याचा यॉर्कर पायाला सूज आणण्यासारखाच असतो. बहुतांश सामन्यात तो डावाचं उद्घाटन करतो.
दुसरीकडे बुमराहचा सहकारी मोहम्मद शमीने तर खऱ्या अर्थाने कमालच केली. क्रिकेटमध्ये फलंदाज हा खरा हिरो असतो, अशी सर्वसाधारण धारणा आहे. परंतु या विश्वचषक स्पर्धेत गोलंदाज काय चीज आहे हे त्याने दाखवून दिलं. झटपट क्रिकेटमध्ये खरा फोकस हा फलंदाजावरच असतो. गोलंदाज फक्त सहाय्यक अभिनेता म्हणून कामगिरी पार पाडत असतात, असा जो एक समज होता तो समज शमीने खऱ्या अर्थाने खोडून काढला. शमीने उत्तर प्रदेशातील छोट्या शहरात तीन वेगवेगळ्या खेळपट्ट्या तयार केल्या. त्यात पहिली बॅटिंग ट्रॅक, दुसरी परदेशात असणाऱ्या खेळपट्टीसारखी आणि तिसरी मंदगती गोलंदाजांना मदत करणारी. गोलंदाजांना संधी मिळाल्यानंतर तिला वश करणं गरजेचं असतं. नेमकं हेच काम धरमशालामध्ये शमीने केलं. आणि बघता बघता विश्वचषकातील गोलंदाजीतला ऑस्कर शमीलाच द्यावा, अशी परिस्थिती निर्माण केली. पूर्ण स्पर्धेत त्याला विकेट घेण्याचे डोहाळेच लागलेत. अर्थात यामागे त्याचे प्रशिक्षक बद्री प्रसाद यांना दुर्लक्षित करून चालणार नाही.
या दोन वेगवान गोलंदाजांना मोहम्मद सिराजने खऱ्या अर्थाने छान साथ दिली. तो काही काळ काही सामन्यात भरकटल्यासारखा वाटला खरा, पण ऐनवेळी त्याने स्वत:ला सावरलं. दुसरीकडे रवींद्र जडेजा किंवा चायनामन कुलदीप यादव यांनी खऱ्या अर्थाने गोलंदाजांना नाचवलं. आठवा फक्त, जडेजाने स्मिथची उडवलेली दांडी. भारतात मंदगती गोलंदाजांसाठी पोषक असणारी खेळपट्टी बनवली जायची. परंतु या विश्वचषक स्पर्धेत भारतीय मंदगती गोलंदाजांनी सर्वच खेळपट्ट्यांवर आपली जादू दाखवली.
जसे जादूगर आपल्या पोतडीतून वाटेल ते बाहेर काढतात अगदी तसेच या विश्वचषक स्पर्धेत मंदगती गोलंदाजांनी वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू बाहेर काढले. एकंदरीत काय तर भारतीय क्रिकेट हे फक्त फलंदाजीवर अवलंबून आहे, हा समज दूर केला. अर्थात यामागे पडद्यामागचे कलाकार आहेत त्यांनाही दुर्लक्षित करून चालणार नाही. त्यांच्याबद्दल आपण उद्या बोलू. एकंदरीत काय तर जे इतर देशातील गोलंदाजांना या स्पर्धेत जमलं नाही ते या विश्वचषक स्पर्धेत भारतीय गोलंदाजांनी सहज करून दाखवले हे विशेष. आता आपल्याला मोजून वीस गडी बाद करायचे आहेत. हे 20 गडी बाद करताना पाचही गोलंदाजांमध्ये चढाओढ असावी एवढीच माफक अपेक्षा.
क्रिकेट समालोचक विजय बागायतकर









