गेल्याच आठवड्यात मराठी नाट्या आणि चित्रसृष्टीतील एक प्रसिद्ध कलाकार रवींद्र महाजनी यांचे निधन झाले. अनेक लोकांनी त्यावर प्रतिक्रिया देताना पैसा, प्रतिष्ठा, नातेवाईक, मित्र कसे आपल्याला मृत्यूच्या वेळेला मदतीला येऊ शकत नाहीत यावर आपापले मत अनेक माध्यमातून व्यक्त केले. काही लोकांनी मनापासून हळहळ व्यक्त केली, काहींनी त्यांना पत्नी-मुलांनी, नातेवाईकांनी असे वृद्धावस्थेत एकांतात का सोडून दिले याबद्दल आश्चर्य आणि राग व्यक्त केला. काही लोकांनी तऊण पिढीला आपल्या आईवडिलांना असे म्हातारपणात वृद्धाश्र्रमात अथवा एकांतात न ठेवण्याचा नैतिक सल्लाही दिला. या सर्व प्रतिक्रिया त्यांच्या त्यांच्या ठिकाणी योग्यच आहेत पण फक्त हळहळ वाटून, शोक करून, वाईट वाटून घेऊन परिस्थितीमध्ये काही सुधारणा होते आहे का? असे पैसा, प्रतिष्ठा, लोकसंग्रह असलेल्या अनेक राजकारणी, सिने-नाट्या क्षेत्रातील, व्यावसायिक, अगदी तथाकथित धार्मिक हजारो व्यक्तींचाही यापूर्वी असाच दु:खद मृत्यू झालेला आहे पण समाज फक्त हळहळ व्यक्त करतो, काही जणांना तात्पुरते स्मशानवैराग्य येते परंतु अशा प्रसंगी आपण काय करावे याची बहुतेक जणांना कल्पनाच नसते. म्हणून समर्थ रामदासस्वामी म्हणतात,
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे । अकस्मात तोही पुढे जात आहे ।। भगवंतांनी बनविलेल्या या सृष्टीचे हे सनातन सत्य आहे की आपल्या मृत्यूच्या वेळी पैसा, प्रतिष्ठा, अनेक प्रकारची निरनिराळ्या क्षेत्रात मिळविलेली सन्माननीय पदके, मित्र-नातेवाईक, हितचिंतक, लोकसंग्रह इत्यादी बाह्य रीतीने आयुष्य खर्ची करून जमविलेले सर्व काही उपलब्ध असूनही उपयोगाला येत नाही. सर्वजण असहाय अवस्थेमध्ये त्या मृतावस्थेत असलेल्या व्यक्तीच्या वेदना त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरामध्ये पाहू शकतो पण काही करू शकत नाही. आजच्या प्रगत विज्ञानाकडेही यावर काही उपाय नाही हे स्वत: वैद्यही सांगू शकतील.
सर्वप्रथम हे समजले पाहिजे की ही समस्या शरीराची नसून ‘आत्मा’ या आपल्या सनातन अवस्थेची आहे. मृत्यूसमयी ‘आत्मा’ हा एकटाच झगडत असतो म्हणूनच जिवंत आणि धडधाकट असतानाच त्याबद्दल भावनावश न होता तात्त्विक सत्य समजून घेऊन काळजी घेतली पाहिजे. बाहेर शरीरासाठी सर्व व्यवस्था करीत असताना त्याचबरोबर ‘आत्मा’ सक्षम, बलवान आणि मृत्यूसारख्या प्रसंगाला आतून तयार करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. हे कसे करावे याबद्दल तुकाराम महाराज म्हणतात,संसाराच्या तापे तापलो मी देवा। करीत या सेवा कुटुंबाची ।।1।। म्हणवुनि तुझे आठवले पाय । ये वो माझे माय पांडुरंगे ।। 2।। बहुतां जन्मीचा जालो भारवाही। सुटिजे हे नाही वर्म ठावे।।3।। वेढियेलों चोरी अंतरबाह्यात्कारी। कणव न करी कोणी माझी।।4।। बहू पांगविलों बहू नागविलों। बहू दिस झालो कासावीस ।।5।। तुका म्हणे आतां धाव घाली वेगीं । ब्रीद तुझे जगि दीनानाथा ।।6।। अर्थात ‘हे दीनानाथ! संसाराच्या त्रिविध तापाने व कुटुंबाची सेवा करता करता मी थकून गेलो आहे. याचकरिता मी तुमच्या चरणांची आठवण केली. हे माझे आई पांडुरंगा तू लवकर ये. अनेक जन्मात घडलेल्या पाप पुण्याच्या ओझ्याखाली मी दडपून गेलो आहे. यातून कसे बाहेर पडावे यांचे रहस्य मला माहीत नाही. आतून कामक्रोधादि चोरांनी व बाहेरून स्त्रीपुऊष, बंधू, मित्र या चोरांनी वेढला गेलो आहे. माझी दया कोणालाही येत नाही, त्यामुळे माझी अवस्था पंगू व्यक्तीसारखी झाली असून जीव कासावीस होतो आहे. आपण दीनांचे नाथ आहात हे वचन पाळण्यासाठी सत्वर धावून या व माझे रक्षण करा.’
या अभंगात तुकाराम महाराज स्वत:च्या उदाहरणावरून नम्रपणे दाखवून देत आहेत की आपण जर भगवंतांना विसरून या संसारात सुखी होण्याचा प्रयत्न केला तर ते किती कष्टप्रद आहे. ज्याचे चित्त भगवत चिंतनामध्ये नाही त्याच्या हृदयामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर हे षड्रिपु त्याला कुटुंब, मित्र परिवार, धन, प्रतिष्ठा, अनावश्यक स्त्रीपुऊष संबंध इत्यादी भौतिक कार्यामध्ये बांधून ठेवतात. अशा आसक्तीमुळेच व्यक्ती पाप पुण्य कर्माच्या बंधनामध्ये अडकला जातो. अशा अवस्थेत त्याची दयाही कोणाला येत नाही कारण त्याला पाहणाराही अज्ञानामुळे त्याच अवस्थेमध्ये आहे. पण तुकाराम महाराजांसारखे साधुसंत जीवांची अशी दयनीय अवस्था पाहून त्यातून बाहेर कसे पडावे यासाठी मार्गदर्शन करतात. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्याला कायम दु:खात टाकणाऱ्या या कर्मबंधनाच्या चक्रातून बाहेर कसे पडावे याचे रहस्य सांगतात (भ गी 9.27) यत्करोषि यदŽासि यज्जुहोषि ददासि यत्। यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुऊष्व मदर्पणम् अर्थात ‘हे कौंतेया! तू जे जे कर्म करतोस, जे जे खातोस, जे जे हवन करतोस, किंवा दान देतोस आणि तू जे तप करतोस, ते सर्व तू मला अर्पण कर.’ त्यासाठी प्रामाणिक हरिभक्तांच्या संगतीमध्ये राहून भगवंताच्या वरील आदेशाचे पालन कसे करावे हे प्रत्येकाने शिकावयास हवे. याप्रमाणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे की त्याने जीवनाला असे वळण दिले पाहिजे की जेणेकरून त्याला कोणत्याही परिस्थितीत भगवान श्रीकृष्णाचे विस्मरण होणार नाही.
यासाठी लागणारी मानसिक अवस्था कशी असावी याचे वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात, हो कां पुत्र पत्नी बंधू । त्यांचा तोडावा संबंधु ।।1।। कळों आले खट्याळसे । शिवो नये लिंपो दोषे ।। 2 ।। फोडावे मडके । मेले लेखी घायें एके ।।3।। तुका म्हणे त्यागें । वीण चुकी जे ना भोगे ।।4।। अर्थात ‘भगवद्प्राप्तीसाठी पुत्र, पत्नी, बंधू कोणीही असो, त्यांचा संबंध तोडावा. जर ते दुराचारी आहेत असे आपल्यास आढळल्यास त्यांना स्पर्शदेखील करू नये. कारण त्यांच्या स्पर्शामुळे दोष आपल्यामध्ये येतात. ती सर्व मेली आहेत असे समजून त्याच्या नावाने मडके फोडून त्यांचा संबंध सोडून द्यावा. असा त्याग केल्याशिवाय संसारातील भोग संपणार नाहीत.
हा अभंग आजच्या आपल्या समाज मान्यतेप्रमाणे कठोर असला तरी त्यामागील आशय समजून घेणे महत्त्वाचे आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात (भ गी 13.10) असक्तिरनभिष्वङ्ग: पुत्रदारगृहादिषु । अर्थात ‘घरदार, पती, मुलेबाळे इत्यादीपासून अनासक्ती हे ज्ञानाचे लक्षण आहे. यावरून असे समजू नये की, मनुष्याला त्यांच्याविषयी भावना, प्रेम असू नये. हे सर्व आपल्या स्वाभाविक प्रीतीचे विषय आहेत. स्वत: तुकाराम महाराजांना पत्नी, मुलेबाळे, घरदार, संसार होता. कर्तव्य पालन करणे आणि आसक्त असणे यात फरक आहे. जर आपली आसक्ती भगवंतावर असेल तर आपोआपच सर्व कर्तव्ये अगदी पतिपत्नी संबंध, पुत्र कन्या, परिवार हे सर्व भगवंताचे आहेत या भावनेने केली तर आपण अनासक्तच आहोत. त्यासाठी घरातील सर्व व्यक्तींनी एकत्र बसून हरिनाम जप करावा, कीर्तन करावे, गीता-भागवत शास्त्राचा अभ्यास करावा आणि त्यातील उपदेशाचे आपल्या जीवनात पालन करून आपले मन व भावना शुद्ध करावी, घरामध्ये भगवंताची सेवा करून त्यांना आपण जे काही सेवन करतो ते सर्व अर्पण करून त्यांचा प्रसाद म्हणून स्वीकार करावा.
याप्रमाणे भगवंतावरील आसक्ती वाढवली की पर्यायाने या संसाराची आसक्ती नाहीशी होते. हे सर्व करताना जाणीव असावी की आपल्याला प्रिय असलेला देह आणि त्यासंबंधित पती, पत्नी, मुलेबाळे, घरदार इत्यादी तात्पुरत्या आहेत, आपली इच्छा नसली तरी त्याचा त्याग आपल्याला एक ना एक दिवस करावाच लागणार आहे. म्हणून मनुष्य जीवनाचे ध्येय भगवद्प्राप्ती आहे हे जाणून जीवनातील कर्तव्ये केल्यास घरातील सर्वानाच त्याचा लाभ होईल, हे कुटुंबावरील आणि मृतावस्थेत असलेल्या व्यक्तीबद्दल खरे प्रेम आहे.
-वृंदावनदास








