जत :
गावगाड्यातील जनता, स्थलांतरीत लोकांना लखपती बनवण्यात शंभर टक्के यशस्वी होणारी योजनाएकमेव मनरेगा आहे. त्यामुळे आज जत तालुक्यात आम्ही राज्यातला पहिला पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरूवात करीत आहोत. 266 योजनांचा लाभ जनतेला घेता येईल, यात कांही त्रुटी, अटी, असतील त्या शिथील करू, निधीची कसलीही कमतरता भासणार नाही. परंतु हा प्रकल्प भविष्यात राज्याला दिशादर्शक देणारा ठरावा, त्यादृष्टीने अधिकाऱ्यांनी काम करावे, असे प्रतिपादन रोहयो तथा फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी केले.
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पुढाकाराने नरेगाच्या पहिल्या पायलट प्रोजेक्टचा शुभारंभ त्यांच्याहस्ते करण्यात आला. राज्य कृषीमुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, प्रकल्प महासंचालक नंदकुमार वाघमारे, जिल्हाधिकारी अशोक काकडे, राजेंद्र शहाळे, अजयकुमार नष्टे, रोहीनी शंकरदास, आनंदा लोकरे, डॉ. रवींद्र आरळी, ब्रम्हानंद पडळकर, सुनील पवार, सरदार पाटील, संजयकुमार तेली, आप्पासो नामद, आकाराम मासाळ, दिग्वीजय चव्हाण, लक्ष्मण जखगोंड, प्रभाकर जाधव, अण्णा भिसे, परशूराम मोरे, रवी मानवर, अतुल मोरे, आर. के. पाटील, शिव तावंशी उपस्थित होते.
गोगावले म्हणाले, माझ्याकडे रोहयो खाते आले. पहिल्यांदा हे खाते मला पसंत नव्हते. परंतु अधिकाऱ्यांची बैठक घेवून या खात्याची कामे पाहिली तेंव्हा समजले की एकनाथ शिंदे यांनी मला योग्य खाते दिले. पहिल्यांदा नंदुरबार जिल्ह्याचा दौरा केला, कामे पाहिली. आता या खात्यातून थेट जनतेपर्यंत जावून कामे करता येतात, जतचा हा माझा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम आहे. पडळकर यांनी तालुक्याला रोहयोतून लखपती बनवण्यास खूप स्पेस असल्याचे सांगितले. त्यानंतर लागलीच आम्ही इथे एक पायलट प्रोजेक्ट करण्याचा निर्णय घेतला. केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयाने चालणारी नरेगा ही महत्वाची योजना आहे. या योजनेत वैयक्तीक व सार्वजनिक कामे मोठया प्रमाणात करता येतात. शिवाय शंभर दिवस रोजगार निर्मीती करून देणारी एकमेव योजना आहे.
- बांबू लावा मानवसृष्टी वाचवा
पाशा पटेल म्हणाले, हवेतील कार्बनचे प्रमाण झपाट्याने वाढते आहे. जतसारख्या दुष्काळी भागांनी तर याचे गांभीर्य आत्ताच ओळखले पाहीजे. जर आपण बांबूची लागवड न केल्यास मानवसृष्टी अडचणीत येवू शकते. यासाठी मी गेली अनेक वर्षे काम करत आहे. येत्या दोन महिन्यात माझ्या विभागाला केंद्र सरकार दहा हजार कोटी रूपये देणार आहे. यातील लागेल तितकी रक्कम जतला देवू. सरकारने बांबू लागवडीला वनविभागाच्या अटीतून मुक्त केले आहे. रोहयोतूनदेखील याची लागवड, रोजगार उभा करू शकतो. 2029 पर्यंत राज्यातले थर्मलचे सर्व प्रोजेक्ट बायोमास करण्याचे आमचे स्वप्न आहे. त्यामुळे जबरदस्त अर्थक्रांती आणि पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या बांबू शेती उद्योगाकडे वळावे, असे ते म्हणाले.
- वर्षाला चारशे कोटी देणारी योजना
आ. गोपीचंद पडळकर म्हणाले, जतसाठी आजचा दिवस क्रांतीकारी आहे. कारण गेली आठ वर्षे रोहयो योजना बंद होती. आज नुसती सुरूच होत नाही तर त्याचा पहिला पायलट प्रोजेक्ट आपण येथे साकारत आहोत. ही योजना आपणाला पाच वर्षात खूप काळजीपूर्वक काम करून यशस्वी करावी लागेल. कारण या योजनेत तब्बल 266 योजनांचा लाभ घेता येतो, प्रत्येक कुटुंबाला लखपती बनवता येते. वर्षाला किमान साडे तीनशे ते चारशे कोटी रूपये मिळू शकतात. या योजनेत कसलाही भ्रष्टाचार होणार नाही. सर्वांना सोबत घेवून काम करावे लागणार आहे. हा तालुका विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे जे करावे लागेल ते करू.
- पाशा पटेलांनी जिंकली मने
शेतकरी नेते पाशा पटेल यांनी खुमासदार शैलीत भाषण करत शेतकऱ्यांची मने जिंकली. अनेक गंभीर गोष्टींवर भाष्य करत चिंतन करायला लावले. बांबूचे महत्व सांगतानाच त्यांनी 70 लाखांची बांबू बस जतसाठी दोन महीने दिली. येथील 117 गावात बांबू बस अर्थात ऑक्सीजन रथ फिरणार आहे. त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी महासंचालक नंदकुमार वाघमारे, आ. सदाभाऊ खोत यांनीही मनोगत व्यक्त केले.








