10 तासात 4.6 किलो वजन केले कमी
वृत्तसंस्था/ पॅरिस
भारताचा युवा कुस्तीपटू अमन सेहरावतने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेत पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात पुर्तो रिकोच्या डॅरियन टोई क्रूझला 13-5 अशा फरकाने पराभूत करताना कांस्यपदक जिंकले. अमनने कांस्यपदक उंचावत अखेर कुस्तीतील पदकाची परंपरा कायम राखली. या पदकासाठी त्याने खूप मेहनत घेतली. अमनने 10 तासांत 4.6 किलो वजन कमी केले. त्याचे वजन वाढले होते. पण एका रात्रीत मेहनत करून त्याने वजन कमी केले. यामुळे अमन सेहरावतच्या कांस्य पदकाच्या सामन्याआधी पूर्णपणे तयारी करण्यात आली होती. विनेश फोगाटसारखा प्रकार घडू नये, यासाठी अमनच्या सपोर्ट स्टाफने काळजी घेतली होती.
अमनने वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतली. अमनचे प्रशिक्षक वीरेंद्र दहिया म्हणाले, उपांत्य फेरीत जपानच्या रे हिगुचीकडून पराभूत झाल्यानंतर अमनचे वजन 61.5 किलो होते. उपांत्य फेरीचा सामना संपताच त्याला दीड तासाचे सेशन दिले. यानंतर रात्री 12 वाजण्याच्या सुमारास जिममध्ये ट्रेडमिलवर तो एक तास पळाला. यानंतर 30 मिनिटांची विश्रांती घेतल्यानंतर त्याला सोना बाथची पाच-पाच मिनिटांची पाच सत्रे झाली. शेवटच्या सत्रानंतर, अमनचे वजन 900 ग्रॅम जास्त होते, म्हणून त्याची मालिश करण्यात आली आणि प्रशिक्षकांनी त्याला हलके जॉगिंग करण्यास सांगितले. यानंतर तो ट्रेडमिलवर पुन्हा 15 मिनिटे धावला. यानंतर पहाटे साडेचारपर्यंत त्याचे वजन 56.9 किलोवर पोहोचले. यावेळी अमनला लिंबू आणि मध आणि कोमट पाण्यासोबत कॉफी देण्यात आली. वजन कमी झाल्यानंतर प्रशिक्षक व सपोर्ट स्टाफला दिलासा मिळाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
वजन कमी करणे हा नित्यक्रमाचा भाग असला तरी यावेळी आम्हाला दुसरे पदक गमावायचे नव्हते. यासाठी अमनने दहा तासात अथक प्रयत्न केले. व्यायामसह सोना बाथ घेत त्याने तब्बल 4.6 किलो वजन कमी केले व शुक्रवारी रात्री कमाल करत कुस्तीत 57 किलो गटात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.









