वृत्तसंस्था/ कोलकाता
माजी जागतिक ब्लिट्झ विजेता मॅक्सिम वॅचियर-लॅग्रेव्हने ‘टाटा स्टील चेस इंडिया 2023’ स्पर्धेचे रॅपिड विजेतेपद आणखी दोन विजयांसह मिळविण्यात यश प्राप्त केले असून भारताचा बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंदने तिसरे स्थान पटकावले आहे. प्रथमच भारताच्या दौऱ्यावर आलेला फ्रेंच खेळाडू लॅग्रेव्हने अझरबैजानचा 2019 सालचा विश्वचषक विजेता तेमूर रदजाबोव्हला (5.5 गुण) खूप मागे टाकत सात गुणांसह अव्वल स्थान पटकावले.
विदित गुजराती आणि अलेक्झांडर ग्रिश्चूक यांच्यासोबत प्रज्ञानंदने प्रत्येकी पाच गुणांसह संयुक्तपणे तिसरे स्थान पटकावले. विश्वचषक उपविजेत्या प्रज्ञानंदने दोन विजय मिळवले, परंतु सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या भारताच्या अव्वल क्रमांकावरील गुकेशविरुद्धच्या सामन्यात त्याला पराभव स्वीकारावा लागला. गुकेशने 45 चालींत हा सामना जिंकला. प्रज्ञानंदने गुजरातीविरुद्धचा सामना मात्र जिंकला. तसेच रॅपिड विजेता एरिगायसीवर 39 चालींत मात केली.
बिएल ग्रँडमास्टर स्पर्धेत पाच वेळा विजेत्या राहिलेल्या मॅक्सिमने दिवसाची सुरुवात भारताच्या अर्जुन इरिगायसीवर विजय मिळवून केली. त्यानंतर पेंटाला हरिकृष्णाचा पराभव करून एक फेरी बाकी असताना आपले जेतेपद निश्चित केले, तर रादजाबोव्हविरुद्धचा सामना बरोबरीत सोडवला.









