वाहनांना पूर्वीप्रमाणे 12+1 पासिंग देण्याची मागणी
बेळगाव : मॅक्सिकॅब वाहनांना पूर्वी 12+1 पासिंग दिले जात होते. परंतु, फेब्रुवारीपासून यामध्ये बदल करण्यात आला असून आता 20+2 याप्रमाणे पासिंग दिले जात आहे. तीन महिन्याला 15 हजार रुपये टॅक्स तर वर्षाला 41 हजार रुपये इन्शुरन्स भरावा लागत आहे. त्यातच आता शक्ती योजनेने मॅक्सिकॅब चालकांचे कंबरडे मोडले असल्याने राज्य सरकारने पूर्वीप्रमाणेच 12+1 प्रमाणे वाहनांचे पासिंग सुरू करावे, अशी मागणी उत्तर कर्नाटक मॅक्सिकॅब असोसिएशनतर्फे बुधवारी राज्य सरकारकडे करण्यात आली. सत्तेत आलेल्या काँग्रेस सरकारने महिलांना मोफत बसप्रवास सुरू केला. मॅक्सिकॅबमधील अधिकाधिक प्रवासी या महिला असल्याने व्यवसायाला मोठा फटका बसला. प्रवाशांची संख्या कमी झाल्याने टॅक्स तसेच इन्शुरन्स भरणे चालकांना शक्य होत नाही. त्यामुळे वाहनचालकांना टॅक्स व इन्शुरन्समध्ये सवलती देऊन वाहक व चालकांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. परिवहन विभागाने 20+2 प्रमाणे वाहनांचे पासिंग सुरू केल्याने मोठ्या प्रमाणात करवसुली केली जात आहे. यामुळे बऱ्याचशा चालकांनी आसपासच्या परिसरात वाहतूक सेवा सुरू ठेवली आहे. परंतु, पासिंग नसल्याने गोवा, महाराष्ट्र या राज्यांमध्ये वाहने घेऊन जाता येत नाहीत. या समस्येतून सुटका करण्यासाठी राज्य सरकारने पूर्वीप्रमाणेच 12+1 पासिंग उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी मॅक्सिकॅब चालकांनी लावून धरली.
शेकडो मॅक्सिकॅब चालकांचा सहभाग
संघटनेचे अध्यक्ष सी. एच. राचन्नावर यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी एच. तोपिनकट्टी, महेश पाटील, शशिकांत दिंडे, मेहबूब शेख, पावलो फर्नांडिस, उत्तम दळवी यांच्यासह धारवाड, विजापूर, बेळगाव, बागलकोट या परिसरातील शेकडो मॅक्सिकॅब चालक सहभागी झाले होते.









