ऑनलाईन टीम / तरुण भारत :
महाविकास आघाडीची वज्रमूठ सैल झाली आहे. लवकरच सगळे आमच्याकडे येणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात आमची सत्ता येईल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादीचे भाजपसोबत बोलणे सुरू असून, ते आमच्यासोबत किती दिवस राहतील हे माहिती नसल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं. त्यावर शरद पवार यांनी चव्हाणांचे काँग्रेसमधील स्थान काय, असा टोला लगावला. तर अध्यक्ष निवडीत पवार अपयशी ठरल्याची टीका सामनामधून करण्यात आली. त्यामुळे मविआतील अंतर्गत वाद आता चव्हाटय़ावर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलं आहे.
मविआतील अंतर्गत वादामुळे त्यांच्यातील बरेचशे नेते आमच्या संपर्कात आहेत. लवकरच ते आमच्याकडे येतील आणि पुन्हा एकदा आम्ही राज्यात सत्ता मिळवू. दरम्यान, न्यायालयाच्या निकालापूर्वी जे सरकार कोसळणार असल्याचा दावा करत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणाही बावनकुळे यांनी यावेळी केली.








