पुणे / प्रतिनिधी :
मावळ लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या निरीक्षक, पक्षाच्या कार्याध्यक्ष आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी चिंचवडमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघासंदर्भात आढावा बैठक घेतली. जोपर्यंत मावळ आपला होत नाही. तोपर्यंत येथे येतच राहणार. मावळ हा काँग्रेसचाच असणार आहे. समझनेवालो को इशारा काफी है, असे सांगत त्यांनी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला मावळमध्ये आव्हान दिले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने स्थानिक पातळीवरील राजकीय स्थितीची माहिती घेण्याकरिता ही बैठक घेण्यात आली. प्रणिती शिंदे यांच्यासह पक्षाच्या निरीक्षक चारुलता टोकस, आमदार संजय जगताप, पिंपरी चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, पिंपरी चिंचवड काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष भरत वाल्हेकर आदी उपस्थित होते. या वेळी प्रणिती शिंदे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा केला व पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष तथा कामगार नेते कैलास कदम यांच्या उमेदवारीचे संकेत दिले.








