मावळ : राज्याच्या विकासात मावळ तालुक्याने जेवढे योगदान दिले, तेवढे कोणी दिले नाही. मावळातील शेतकऱ्यांचा त्याग लक्षात घेता मावळ हे खऱ्या अर्थाने राज्याचे विकासाचे केंद्र आहे असे म्हणणे सार्थ ठरेल. १० धरणे, ४ एमआयडीसी, २ राष्ट्रीय महामार्ग, सरंक्षण खात्याचे डेपो, मिसाईल प्रकल्प अशा विकास कामांसाठी मावळातील शेतकऱ्यांनी जमिनी देऊन त्याग केला आहे, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
विधानभवनातील २८८ आमदारांपैकी उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या पाच आमदारांच्या यादीमध्ये बाळा भेगडे यांचे नाव होते, असे गौरवोद्गार बावनकुळे यांनी काढले.
आंबी मावळ येथे शिरे-शेटेवाडी ह्या गावांच्या पुनर्वसन भूखंडाचे वाटप त्यांच्या हस्ते झाले. शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री संजय तथा बाळा भेगडे होते. याप्रसंगी मावळचे खासदार श्रीरंग बारणे,आमदार विक्रांत पाटील, आरपीआय जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष गणेश भेगडे,तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, मावळ शिवसेना अध्यक्ष राजेश खांडभोर,पोटोबा महाराज देवस्थान मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, एकनाथ टिळे, निवृत्ती शेटे, गुलाबराव म्हाळसकर, जि प सदस्य नितीन मराठे, युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, महिला अध्यक्षा सायली बोत्रे, सुमित्रा जाधव, कल्याणी ठाकरसह सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच,सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले की, शिंदे-फडणवीस हे सरकार गोरगरीबांचे, महिलांचे व शेतकऱ्यांचे असल्याने शेतकऱ्यांसाठी व महिलांसाठी अतिमहत्त्वाचे निर्णय ह्या सरकारने घेतले आहेत.विकासाची गती तळागाळापर्यंत पोहचविण्याचा निर्धार ह्या सरकारचा आहे. दुहेरी इंजिन असल्यामुळे राज्याचा विकास गतिने होत आहे आणि मोदींचे आत्मनिर्भर भारत बनण्याचे स्वप्न २०३५ पर्यंत साकार होईल असेही बावनकुळे यांनी सांगितले.








