पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केली द्विपक्षीय चर्चा
भारत-मॉरीशस सहकार्य अधिक दृढ
- भारताच्या ‘शेजारी प्रथम’ या धोरणाचा मॉरीशस हा सर्वात महत्वाचा घटक
- शिक्षण, व्यापार, ऊर्जानिर्मिती, तंत्रवैज्ञानिक संशोधन, अंतराळ क्षेत्रात करार
- भारताचे मॉरीशसला नेहमीच उत्कट सहकार्य : रामगुलाम यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मॉरीशसचे राष्ट्रनेते नवीनचंद्र रामगुलाम यांनी दिल्लीत चर्चा केली आहे. रामगुलाम सध्या भारताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले असून गुरुवारी भारताशी या देशाने अनेक करार केले आहेत. भारत आणि मॉरीशस यांच्यात पूर्वापारपासून अत्यंत जवळचे संबंध आहेत. मॉरीशसशी भारताचा व्यापार स्थानिक चलनात करण्याचा महत्वाचा करार करण्यात आला आहे. हा करार दोन्ही नेत्यांच्या वाराणसीतील भेटीनंतर करण्यात आला. यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणि व्यवहार अधिक सुलभ पद्धतीने होणार आहे. भारतातील दोन शिक्षण संस्थांनी मॉरीशसशी संशोधन आणि तंत्रज्ञान विकासासंबंधी करारही गुरुवारी केले आहेत. स्थानिक चलनात व्यापार करण्याच्या दिशेने दोन्ही देश प्रयत्नशील असून त्यामुळे दोन्ही देश एकमेकांच्या अधिक जवळ येतील, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंतर व्यक्त केली आहे.
हिंदी महासागरात सहकार्य
हिंदी महासागर क्षेत्रात एकमेकांना सामरिक आणि आर्थिक सहकार्य करण्याचा निर्णयही दोन्ही नेत्यांच्या शिखर परिषदेत घेण्यात आला आहे. हिंदी महासागर प्रदेश स्वतंत्र, सुरक्षित, स्थिर आणि समृद्ध व्यापार विभाग म्हणून विकसीत करण्याच्या दृष्टीने दोन्ही देश एकमेकांसह कार्यरत राहतील, असे ठरविण्यात आले.
विकासात साहाय्य करणार
भारत मॉरीशसच्या विकासात त्याला मोठे साहाय्य करणार आहे. त्या देशातील पायाभूत सुविधा निर्माणकार्य, शास्त्रीय आणि तंत्रवैज्ञानिक संशोधन, ऊर्जानिर्मिती, अंतराळ संशोधन आणि विकास, शिक्षणविकास आदी क्षेत्रांमध्ये भारत गुंतवणूक करणार असून त्या संबंधीचे अनेक करार गुरुवारी करण्यात आले आहेत.
राष्ट्रीय रुग्णालय, विमानतळ
मॉरीशसमध्ये भारत त्या देशाला राष्ट्रीय रुग्णालयाच्या निर्मितीकार्यात साहाय्य करणार आहे. तसेच त्या देशाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आधुनिकीकरण आणि विकासकार्यात गुंतवणूक करणार आहे. भारत त्या देशात एक विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास प्राधिकरण स्थापन करणार असून दोन्ही देश अनेक विषयांवर संयुक्त संशोधन करतील, असेही निर्धारित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
सौरऊर्जा निर्माण करणार
मॉरीशस देशाची ऊर्जा आवश्यकता भागविण्यासाठीही भारत पुढाकार घेणार आहे. त्या देशात सौरऊर्जा प्रकल्प भारताकडून स्थापन केला जाईल. तसेच ऊर्जा हस्तांतरणातही साहाय्यक ठरणार आहे. तमारिंड धबधबा क्षेत्रात 17.5 मॅगावॅट क्षमतेचा तरता सौरऊर्जा प्रकल्प भारताकडून स्थापन केला जाणार असून त्यामुळे या देशाला स्वच्छ आणि पर्यावरणस्नेही ऊर्जा मिळण्यात साहाय्य होणार आहे.
प्रशासकीय सुधारणांमध्येही सहभाग
मॉरीशसच्या आर्थिक विकासाप्रमाणेच प्रशासकीय कामकाज विकासातही भारत सहभागी होणार आहे. या देशाच्या 500 हून अधिक नागरीकांना भारत आपल्या देशात प्रशासकीय सेवांचे प्रशिक्षण देणार आहे. या प्रकल्पाचा आता प्रारंभ झाला असून मसुरी येथील प्रशिक्षण केंद्रात मॉरीशसच्या प्रथम गटाला सध्या प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच इतरही अनेक प्रकल्पासंबंधातले करार करण्यात आले आहेत.
भारताचे नेहमीच सहकार्य
मॉरीशसच्या विकासात भारतानचे आजपर्यंत नेहमीच सहकार्य मिळत आलेले आहे, अशी प्रशंसा नवीनचंद्र रामगुलाम यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केल्यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकारपरिषदेत भाग घेतला. मॉरीशसच्या विकासात सहभागी होण्यात भारताला नेहमीच आनंद वाटत आला आहे, अशी भलावण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यावेळी केली आहे.









