लोणंद :
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचा पुणे जिह्यातील प्रवास अत्यंत भक्तिभावाने पार पडला आहे. आता हा ऐतिहासिक आणि अध्यात्मिक सोहळा हैबतबाबांच्या भूमित म्हणजे सातारा जिह्यात गुरुवार 26 रोजी दुपारी दाखल होत आहे. जिल्ह्यातील चार मुक्कामापैकी पहिला मुक्काम लोणंद गावात होणार आहे. या स्वागतासाठी जिल्हावासियांसह लोणंदनगरी सज्ज झाली आहे. प्रशासनातर्फे स्वागताची तसेच वारकऱ्यांच्या संपूर्ण सेवेची जय्यत तयारी केली आहे. पालखी सोहळ्याच्या आगमनाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हालेला आहे.
संत परंपरेचं व्रत जोपासणारा लोणंद मुक्काम गुरुवार दि. 26 जून रोजी माउलींच्या पालखीचे लोणंद येथे आगमन होणार असून, हा मुक्काम वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या मुक्कामासाठी संपूर्ण गावात उत्सवाचे आणि अध्यात्मिकतेचे वातावरण आहे. प्रत्येक वारकरी माउलीच्या स्वागतासाठी सिद्ध झालेला आहे.
- गावात फुलांची सजावट, टाळमृदुंगाचा निनाद
गावातील मुख्य रस्त्यांपासून विसाव्याच्या ठिकाणांपर्यंत विविध धार्मिक मंडळांनी व स्थानिक नागरिकांनी पालखी स्वागतासाठी आकर्षक फुलांची तोरणे, कमानी, पताका लावल्या आहेत. काही ठिकाणी वारकऱ्यांसाठी छत्र्या, पाणपोई, आरामशाळा व औषधोपचार केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
- लोकसहभागातून उभारलेली भक्तिरूपी सेवा
लोणंद नगरपंचायत, स्थानिक पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग, नगरसेवक मंडळी आणि विविध सामाजिक संघटना यांनी एकत्र येऊन या मुक्कामासाठी नियोजनबद्ध व्यवस्था आखली आहे. लोणंद व परिसरातील नागरिकांनी आपल्या घरांचे दरवाजे, अंगण, हॉल वारकऱ्यांच्या विश्रांतीसाठी खुले केले आहेत.
- महाप्रसाद व अन्नछत्रांची व्यवस्था
वारकऱ्यांसाठी अन्नछत्रे, पाण्याच्या टाक्या, चहा-नाष्ट्याची केंद्रे उभारण्यात आली आहेत. काही संस्था रात्रभर भजन-किर्तनाचे कार्यक्रम सादर करणार असून, ‘माउली पाहुण्या घरी आल्या’ या भावनेतून लोकांनी परस्पर प्रेम आणि सहकार्य दाखवले आहे.
- वारकऱ्यांची आस्था आणि लोणंदकरांची भक्ती
माऊलींच्या दर्शनासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण लोणंदमध्ये आले आहेत. महिला भगिनी पारंपरिक वेशात किर्तनात रंगल्या आहेत, तर बालवारकरी आपल्या गोड आवाजात हरिपाठ करत आहेत. रस्त्यांवर ‘पंढरीच्या वाटेवर’ हे भावगीत वारंवार ऐकू येत असून, साऱ्या वातावरणात एक वेगळीच ऊर्जा संचारत आहे. ‘माऊली आलिया आपल्या घरी’ असा आनंद लोणंदकरांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.
- सातारा पोलीस दल सज्ज
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. 26 ते दि. 30 या कालावधीमध्ये सातारा जिल्ह्यातुन मार्गस्थ होणार आहे. पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनानुसार बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. बंदोबस्ताकरीता एकुण 121 पोलीस अधिकारी, 907 पोलीस अंमलदार, 7000 होमगार्ड, 01 एस. आर. पी कंपनी व 02 आरसीपी पथक पालखी सोहळयामध्ये बंदोबस्त कामी नेमण्यात आले आहेत. सदरचा बंदोबस्त हा 77 परिशिष्ठमध्ये लावण्यात आलेला आहे. पालखी आगमन व मुक्कामाचे ठिकाणी तसेच पालखी सोहळयामध्ये गर्दीचे ठिकाणी नियंत्रण ठेवण्यासाठी खाजगी व सरकारी सीसीटीव्ही कॅमेरे ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. पालखी सोहळयामध्ये खाजगी वेशात पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तैनात करण्यात आले आहेत. लोणंद, तरडगाव, फलटण, बरड पालखीतळ येथे ठिकठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पालखी तळ येथे शासकीय ड्रोन कॅमेरेद्वारे सर्व हालचालीवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. पालखी मुक्कामाचे वेळी भाविकांचे वाहनाचे पार्कींगबाबत तसेच पायी मार्गाचे व्हिडीओ सातारा जिल्हा पोलीस दला मार्फत प्रसारित करण्यात आले आहे. भाविकांनी त्याचे अवलोकन करुन पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले आहे.








