पिंपरी / प्रतिनिधी :
चार लाख भाविकांची मांदियाळी…त्यांच्या मुखातून अखंडपणे होणारा माउली नामाचा जयघोष…अन् इंद्रायणीत उमटलेले भक्तीचे तरंग…अशा अत्यंत भारावलेल्या व भक्तिभावमय वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा 726 वा संजीवन समाधी सोहळा मंगळवारी पार पडला. यंदा निर्बंधमुक्त असा सोहळा पार पडल्याने वारकऱ्यांमधील आनंद द्विगुणित झाल्याचे पहायला मिळाले.
अलंकापुरीमध्ये गुरुवारपासून माउलींचा संजीवन समाधी सोहळा रंगला. ज्ञानोबा माउलींच्या जयघोषात अवघी आळंदी दुमदुमून निघाली. कोरोनाच्या दोन वर्षांच्या कार्यकाळानंतर पहिल्यांदाच माउलींचा संजीवन समाधी सोहळा हा निर्बंधमुक्त पार पडला. राज्याच्या कानाकोपऱ्यातील चार लाख वारकरी आळंदीत एकवटले असून, मागच्या पाच दिवसांपासून आळंदीनगरी गजबजून गेली आहे. मंगळवारी ज्ञानोबा माऊली, तुकोबांच्या गजरात अलंकापुरी न्हाऊन निघाली.
अधिक वाचा : पुण्यातील सेक्सटॉर्शन प्रकरणाचे राजस्थान कनेक्शन उघड
समाधी सोहळय़ाची सुरुवात कीर्तनाने झाली. सव्वा बाराच्या सुमारास माउलींच्या संजीवन समाधीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. सकाळी 7 ते 9 या वेळेत हभप हैबतबाबा पायरीपुढे कीर्तन झाले. सकाळी 7:30 ते 9:30 यादरम्यान वीणा मंडप कीर्तन पार पडले. भोजलिंग काका मंडप येथे 7 ते 9 कीर्तन झाले. त्यानंतर सकाळी 9 ते 10 यावेळी महाद्वारात काल्याचे कीर्तन झाल्यानंतर हभप हैबतबाबा दिंडीने समाधी मंदिरात प्रदक्षिणा घातली.
9 ते 11 कीर्तन भोजलिंग काका मंडप व माउली मंदिरात सकाळी 10 ते दुपारी 12 यावेळेत हभप रामदास महाराज यांचे संजीवन समाधी सोहळय़ाचे कीर्तन पार पडले. यानिमित्ताने मंदिरात माउलींची नितांतसुंदर रांगोळी काढण्यात आली. माउली मंदिरामध्ये आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली होती. दुपारी बारा ते साडे बारादरम्यान संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 726 व्या संजीवन समाधी सोहळय़ानिमित्त घंटानाद झाला. त्यानंतर संजीवन समाधीवर पुष्पवृष्टी करण्यात आली व उपस्थित मान्यवरांना नारळ प्रसाद देण्यात आला, अशी माहिती देवस्थानचे विश्वस्त विकास ढगे यांनी दिली.








