प्रयाग चिखली, वार्ताहर
करवीर तालुक्यातील केर्ली येथील माजी सरपंच विश्वनाथ पोवार यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या भव्य कुस्ती मैदानात गंगावेस तालमीचा महान भारत केसरी पै.माऊली जमदाडे याने पारनेर तालमीच्या उपमहाराष्ट्र केसरी पैलवान योगेश पवार याला हप्ता डावावर सोळाव्या मिनिटाला आसमान दाखवून भाजपा केसरी पर्यायाने अडीच लाखाचे बक्षीस पटकावले.
मैदानातील दुसऱ्या क्रमांकाची दीड लाख बक्षीसाच्या कुस्तीमध्ये शाहूपुरीच्या पै.लिंगाप्पा पुजारी याने दुहेरी पट काढत इचलकरंजीच्या पै.संतोष लव्हटे याला चितपट केले तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती शाहुपुरीच्या पै.शशिकांत बोंगाडे याने जिंकली तर चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत केर्ली गावच्या पै.रणवीर पाटील याने शाहू आखाड्याचा महाराष्ट्र चॅम्पियन पै. सचिन पाटील यास पाचव्या मिनिटात बॅक थ्रो डावावर आश्चर्यकारकरित्या आसमान दाखवत पाऊण लाखाचे बक्षीस आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली.मातीतील कुस्ती टिकावी या उद्देशाने येथील पोवार कुटुंबाने वाढदिवसाचे औचित्य साधून शेकडो लढती लावून लाखो रुपयाच्या बक्षिसाची अक्षरशः खैरात करून मैदान यशस्वी ठरवले.
सुरुवातीस आखाडा पूजन अशोक पोवार,सुभाष पोवार, एस एन पोवार यांच्या हस्ते झाले.तर क्रमांक एक कुस्तीला भाजपाचे नेते ना.चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते सलामी देण्यात आली. यावेळी हिंदकेसरी दीनानाथ सिंह राष्ट्रकुल विजेते राम सारंग ,कृष्णराज महाडिक ‘आरपीआय’ चे उत्तम कांबळे तानाजी पोवार (इचलकरंजी), सुहास लटोरे, विठ्ठल पाटील, सत्यजित उर्फ नाना कदम, संग्राम निकम, नामदेव पाटील, गजानन सुभेदार, हर्षवर्धन पोवार, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांनी उपस्थितांना गावागावातील तालमी जिवंत ठेवा आणि मातीतील कुस्ती टिकवा असे कळकळीचे आवाहन करून मैदानाच्या आयोजनाबद्दल पोवार यांनी कुटुंबाचे आभार मानले. मैदानामध्ये पंच म्हणून वस्ताद बाजीराव पाटील, मारुती जाधव, सुनील फाटक, राजाराम पाटील यांनी काम पाहिले. निवेदक म्हणून कृष्णात चौगले, दीपक वरपे, मारुती जाधव, धनाजी मदने यांनी काम पाहिले.यावेळी मैदानामध्ये दीडशेवर छोट्या मोठ्या लढती पार पाडल्या.
या मैदानात पार पडलेल्या प्रमुख लढतीतील विजय मल्ल असे
बिरदेव बनसोडे ,रोहित बनसोडे (शाहू कुस्ती केंद्र), ऋषिकेश पाटील (शाहूपुरी), बसून भागवत (अहमदनगर), हर्षद दानोळे, पृथ्वीराज पोवार, शैलेश खोत (मोतीबाग), स्वरूप , अनिल चव्हाण( न्यू मोतीबाग), निलेश सूर्यवंशी (गंगावेश), आदित्य (भाडकर ),निगवे संभाजी धंदरे (राशिवडे).
Previous Articleवाळवा तालुक्यातील कार्वेत विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू
Next Article पिरनवाडी येथे टँकरच्या धडकेत वृद्ध ठार









