► वृत्तसंस्था / अहमदाबाद
आपल्या मदरशात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मौलानाला गुजरात पोलिसांनी अटक केली आहे. गुजरात राज्याच्या जुनागढ जिल्ह्यातील मंगरोल तालुक्यातील मदरशाचा मौलाना, तसेच या मदरशाचा विश्वस्त यांच्यावर संबंधित कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या मदरशात शिकणाऱ्या एका 15 वर्षीय मुलाने 20 दिवसांपूर्वी आपल्यावर लैंगिक अत्याचार करण्यात येत असल्याची माहिती आपल्या पालकांना दिली होती. त्यांनी पोलिसात तक्रार नोंद केल्याने या प्रकरणाची चौकशी हाती घेण्यात आली. या 25 वर्षीय मौलानाने इतर अनेक मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती तपासात उघड झाली. एकंदर आठ मुलांनी तक्रारी सादर केल्या आहेत. बऱ्याच काळापासून हे अत्याचार सुरु होते, असेही दिसून आले. हा मौलाना पिडित मुलांना जीवे मारण्याची धमकी देत असे. त्यामुळे अनेकांनी तक्रार सादर करण्याचे धाडस दाखविले नाही. पिडितांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी नंतर स्पष्ट केले असून अधिक तपास सुरु आहे.
मौलाना उर्दूचा शिक्षक
हा मौलाना या मदरशात उर्दू भाषा शिकविण्यासाठी नियुक्त करण्यात आला होता. त्याच्या वर्तणुकीसंबंधी अनेक तक्रारी पालकांनी मदरशाच्या व्यवस्थापनाकडे केल्या होत्या. तथापि या मदरशाच्या विश्वस्तानेही या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने एका मुलाच्या पालकांनी पोलिसांमध्ये तक्रार नोंदविली. त्यानंतर मौलानाच्या घृणित कृत्याचा पर्दाफाश झाला. त्याच्या कृत्यांवर पांघरुण घालणाऱ्या विश्वस्तालाही आता अटक करण्यात आली असून पुढील तपास करण्यात येत आहे.









