हिंदूविरोधात प्रक्षोभक भाषणांसाठी कुख्यात
वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनच्या पोलिसांनी वादग्रसत मौलाना अंजेम चौधरीला दहशतवाद्यांशी संबंध राखल्याप्रकरणी अटक केली आहे. लंडन पोलिसांनी अंजेम चौधरीच्या घरावर छापा टाकत त्याला ताब्यात घेतले आहे. यानंतर ब्रिटनच्या दहशतवादविरोधी पथकाने लंडनच्या हीथ्रो विमानतळावर कॅनडामधून आलेल्या एका इसमाला अटक केली आहे. या दोघांवरही दहशतवादी संघटनांशी संबंध बाळगल्याचा आरोप आहे.
अंजेम चौधरी ब्रिटनमध्ये खलिफा राजवट लागू करू पाहत आहे. तसेच तो ब्रिटनमध्ये राहत असलेल्या हिंदूधर्मीयांच्या विरोधात प्रक्षोभक वक्तव्ये करत असतो. स्थानिक पोलिसांनी चौधरीशी संबंधित तीन ठिकाणांची झडती घेतली आहे.
पेशाने वकील असलेला अंजेम चौधरी हा ब्रिटनमधील सर्वात प्रभावी कट्टरवादी धार्मिक नेता आहे. अंजेमला 2016 मध्ये इस्लामिक स्टेटसाठी पाठिंबा जमविल्य्राकरणी तुरुंगवासही झाला होता. तुरुंगातून बाहेर पडल्यावर अंजेम पुन्हा एकदा प्रक्षोभक भाषणे करू लागला आहे. जानेवारी महिन्यात अंजेमने स्वत:च्या आत्मकथेत ब्रिटनचे राजपुत्र हॅरी यांना अफगाणिस्तानात तालिबानच्या 25 दहशतवाद्यांच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरविले होते.
अंजेम चौधरीवर बंदी
दहशतवादविरोधी पथकाने दोन जणांना अटक केली आहे. या दोघांवरील दहशतवादी संघटनांशी संबंध बाळगल्याचा आरोप आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असल्याचे सांगण्यात आले. अंजेम चौधरीकडून ब्रिटनमध्ये राहत असलेले हिंदू आणि मुस्लिमांदरम्यान वैमनस्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. ब्रिटनमधील मुस्लीम युवांना कट्टरवादात लोटण्याचा आरोप त्याच्यावर आहे. ब्रिटनमध्ये सार्वजनिक ठिकाणी भाषण करण्यास त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. तसेच मोबाइल आणि इंटरनेट वापरण्यास बंदी घातली गेली होती. लिसेस्टर भागात काही काळापूर्वी झालेल्या हिंसेत अंजेम चौधरीचा हात होता. या हिंसेदरम्यान तेथील हिंदूंना लक्ष्य करण्यात आले होते.









