वृत्तसंस्था/ मेलबोर्न
सध्या भारतात सुरु असलेल्या आयसीसीच्या पुरुषांच्या विश्वचषक स्पर्धेनंतर होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व यष्टीरक्षक आणि फलंदाज मॅथ्यू वेडकडे सोपवण्यात आल्याची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने दिली आहे.
35 वर्षीय मॅथ्यू वेडने गेल्या वर्षी झालेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत आपला सहभाग दर्शवला होता. या स्पर्धेनंतर त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द संपुष्टात येण्याच्या मार्गावर होती पण भारताविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी मॅथ्यू वेडकडे पुन्हा संघाचे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतला आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा केली असून त्यामध्ये आघाडीच्या वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आलेला नाही. दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या मालिकेत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मिचेल मार्शला अशीच संधी दिली होती. विश्वचषक क्रिकेट स्पर्धा संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कसोटी आणि वनडे संघांचा कर्णधार पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, हॅझलवूड, अष्टपैलू मिचेल मार्श आणि कॅमेरुन ग्रीन हे मायदेशी परतणार आहेत. दरम्यान डेविड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि हेड यांचा या संघात समावेश करण्यात आला आहे. मॅट शॉर्ट, जॉन्सन आणि तन्वीर सांघा यांचा संघात समावेश आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेला 23 नोव्हेंबरपासून विशाखापट्टणम येथे प्रारंभ होईल.
ऑस्ट्रेलिय टी-20 संघ : मॅथ्यू वेड (कर्णधार), बेरेनडॉर्फ, अॅबॉट, टीम डेविड, इलिस, ट्रेविस हेड, इंग्लिश, जॉन्सन, मॅक्सवेल, तन्वीर सांघा, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, स्टोईनिस, वॉर्नर आणि झम्पा.









