विनोद सावंत, कोल्हापूर
Kolhapur News : राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर असताना कोल्हापुरातील आघाडीच्या नेत्यांनी ताकद पणाला लावून आणलेल्या 15 कोटींच्या निधीला सत्तांतरानंतर ब्रेक लागला आहे.यामध्ये इनडोअर स्टेडियमसाठीचा 10 कोटींचा निधी ‘दक्षिण’मध्ये वळवला.रस्ते,गटारी,ड्रेनेज आदींसाठी मिळालेला 5 कोटींचा निधी जीम उभारण्यासाठी वर्ग केला आहे.निधीच्या पळवापळवीत कुरघोडीचे राजकारणामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा फटका शहराच्या विकासकामांना बसत आहे.
शहरात असो की ग्रामीण भागात सत्ताधारी-विरोधकांमध्ये राजकीय कुरघोडी ठरलेली असते.कोल्हापूरही याला अपवाद नाही.येथे महाडिक विरूद्ध पाटील यांच्यातील टोकाचा राजकीय संघर्ष नवीन नाही.सर्वच जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात राजकीय कुरघोडीचा अनुभव येतो.परंतु कोल्हापूरमध्ये वेगळेच चित्र आहे.कोल्हापुरात एकाने निधी आणला तर त्याचे श्रेय त्याला मिळू नये यासाठी राजकीय ताकद पणाला लावली जात आहे.मिळालेल्या निधीच्या आडवे येण्यातील ही राजकीय कुरघोडी विकासासाठी धोकादायक ठरत आहे.
महाविकास आघाडी सत्तेवर असताना कोल्हापुरातील आघाडीतील नेत्यांनी राजकीय ताकद वापरून काही निधी कोल्हापूरसाठी खेचून आणला.यामध्ये काही कामे झाली,तर काही कामे सुरू होणे बाकी होते.दरम्यान, राज्यात सत्तांतर झाले.भाजप-शिवसेना शिंदे गटाची एकनाथ शिंदे यांची सत्ता आली.यानंतर महाविकास आघाडीने मंजूर केलेला निधी भाजप-शिंदे सरकारमधील कोल्हापुरातील नेत्यांनी दुसरीकडे वळवला.बालिंगा येथे इनडोअर स्टेडियमध्येसाठी 10 कोटींचा निधी दक्षिण मतदारसंघातील कामांसाठी वळवण्यात आला.
काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी शहरासाठी विशेष बाब म्हणून रस्ते,गटारी,ड्रेनेजलाईनंसाठी 5 कोटींचा निधी खेचून आणला होता.याची निविदा प्रक्रियाही होणार होती.परंतु सत्तांतरामुळे सत्ताधाऱ्यांनी हा 5 कोटींचा निधी जीमसाठी वळवला आहे.महाविकास आघाडीने मंजूर केलेला 15 कोटींचा निधी इतरत्र वळवला आहे.नगरोत्थान योजनेमधील 100 कोटीच्या मंजूर निधीवरूनही आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.महापालिकेच्या आगामी निवडणुकीत या कामाचे श्रेय मिळू नये.यासाठीच हा सर्व खटाटोप असल्याचा आरोप आता होत आहे.कोल्हापुरातील टोकाचा राजकीय संघर्षाचा परिणाम विकासकामांवर होत आहे.
निधीचा वाद गेला कोर्टात,आज सुनावणी
महाविकास आघाडी आणि महायुतीमधील निधी वॉर आता न्यायालयात पोहोचले आहे.काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी 5 कोटींचा निधी वळवल्यावरून मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. गुरूवारी यासंदर्भात सुनावणी होणार आहे.
कुरघोडीसाठी सत्तेचा वापर
युती सरकार सत्तेत असताना महाडिकांनी मंजूर पेलेल्या निधीतील कामासाठी महापालिकेतून एनओसी देताना काँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक चालढकलपणा करत होते.आता पाटील गटाने मंजूर पेलेला निधी महाडिक गट सत्तेवर असल्याने दुसरीकडे वळवला जात आहे.कुरघोडीसाठी सत्तेचा वापर होणे दुर्देवी आहे.वास्तविक जास्तीची विकासकामे कशी होतील,यासाठी स्पर्धा होणे आवश्यक आहे.
5 कोटींच्या निधी परत मिळेपर्यंत लढणार
महाविकास आघाडी सत्तेवर असताना कोल्हापूरसाठी 5 कोटींचा निधी आणला.रस्ते, गटारी, ड्रेनेजलाईनसाठी हा निधी वापरला जाणार होता.सत्तांतरनंतर हा निधी जीमसाठी वळवला आहे.हा निधी पूर्ववत वर्ग हाईपर्यंत न्यायालयीन लढाई सुरू ठेवणार आहे.
सचिन चव्हाण,शहराध्यक्ष,काँग्रेस









