न्हावेली /वार्ताहर
मातोंड – पेंडूर येथील स्वयंभू व जागृत देवस्थान अशी ख्याती असलेल्या श्री देव घोडेमुख देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवार २५ नोव्हेंबर रोजी होत आहे.ही जत्रा कोब्यांची जत्रा म्हणूनही प्रसिद्ध आहे.यानिमित्त सकाळपासून केळी ठेवणे,नवस फेडणे,नवस बोलणे आदी कार्यक्रम होणार आहेत.दक्षिण कोकणातील प्रसिद्ध देवस्थान व भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या शिवमार्तंडेश्वराचे हे वस्तीस्थान आहे.३६० चाळ्यांचा अधिपती भूत पिशाच्च गण यांचा नायक म्हणून त्याचा येथे वास असतो.अशी ग्रामस्थांची दृढ श्रध्दा आहे.विशेष म्हणजे नवसाला पावणारा म्हणून या देवस्थानची ख्याती सर्वदूर आहे.शरीराच्या कुठल्याही अवयवाचं दुखण असेल तर येथे नवस बोलला जातो.हा नवस फेडताना त्या अवयवाच्या मातीची प्रतिकृती देवाला वाहिली जाते.देशभरातून भाविक या देवाच्या चरणी नवस बोलण्यासाठी येतात. देव दिपावली दिवशी मातोंड येथील ग्रामदैवत श्री देवी सातेरी मंदिरात मांज्री बसते.त्यानंतर सलग तीन दिवस या मंदिरात जागर होतात. चौथ्या किवा पाचव्या दिवशी म्हणजेच घोडेमुख जत्रोत्सवादिवशी गावकर मंडळी व इतर मानकरी सातेरी मंदिरात जमून मेळेकरी भूतनाथ व पावणाई देवतांना उपार केल्यानंतर गावकर व इतर मानकऱ्यांसह गावचा कोंब्याचा मान चाळ्यांना दिला जातो.विविध धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी ६ च्या सुमारास मेळेकरी भूतनाथ व पावणाई अवसारासह खाली येतात सातेरी मंदिराकडे मार्गस्थ होतात.त्यानंतर या कार्यक्रमाची सांगता होते.









