सातारा प्रतिनिधी
सातारा शहर व परिसरात समीर सलिम कच्छी याच्या मटक्याच्या टपऱ्याचे पेव फुटले होते. एमआयडीसीमध्ये तर अक्षरश: कहर केला आहे. अगदी सातारा पालिकेच्या समोर असलेल्या पाण्याच्या टाकीखाली टपरी आहे. त्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांची बदली झाल्यानंतर शहर पोलिसांनी मटका किंग याच्यावर एका दिवशी पाच गुन्हे शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.
सातारा शहरातील अनेक मटक्याच्या टपऱ्या समीर कच्छी हा चालवतो. मटक्याच्या टपऱ्यात मटका राजरोसपणे सुरु असल्याचे वृत्त ‘तरुण भारत’ने प्रसिद्ध केले होते. त्या टपऱ्यांची माहिती सुद्धा ‘तरुण भारत’ने फोटोसह अनेकवेळा प्रसिद्ध केली होती. अगदी सातारा पालिकेच्या समोर असलेल्या मटक्याच्या अड्ड्याची बातमी केली होती. परंतु नुकतीच सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांची बदली झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये सातारा शहर पोलिसांनी भिमाबाई झोपडपट्टी येथे जुगार अड्ड्यावर कारवाई करुन भिमा शिवय्या गुत्तेदार (वय 40 रा. भिमाबाई आंबेडकर झोपडपट्टी) याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याच्या ताब्यातून 2020 रुपयांची रोखड व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आली. त्या जुगार अड्ड्याचा मालक समीर सलीम कच्छी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
चंदननगर कोडोली येथे परफेक्ट कंपनीच्या समोर चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर जुगार चालवणारा रामदास श्रीरंग यादव (वय 42 रा. धनगरवाडी) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडून 1520 रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. जुगार अड्ड्याचा मालक समीर सलिम कच्छी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरबाजार येथील लोखंडी पुलाच्या शेजारी पत्र्याच्या शेडच्या आडोशाला चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये उत्तम कल्याण दंडगुले (वय 28 , रा. लक्ष्मीटेकडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडून 840 रुपये व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. समीर कच्छी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोडोली येथे विराज बेकरीच्या आडोशाला चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर कारवाई करुन जितेंद्र लादमल शहा (वय 57), रजत जितेंद्र शहा (वय 26, दोघे रा. कोडोली) याच्यावर गुन्हा दाखल करुन 23 हजार 550 रुपये व जुगाराचे साहित्य व दोन मोबाईल हस्तगत केले. त्याचबरोबर समीर कच्छी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
तसेच पालिकेच्या समोर पाण्याच्या टाकीखाली चालणाऱ्या मटक्याच्या अड्ड्यावर शहर पोलिसांनी दि. 1 रोजी दुपारी कारवाई केली. तेव्हा श्रीरंग आनंदराव पवार (वय 56 रा. करंजे) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्या बरोबरच समीर कच्छी याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्याकडून 1680 रुपयांची रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. मात्र शहर पोलिसांनी केवळ नोटीस बजावली आहे.