सावंतवाडी : प्रतिनिधी
Mathkar Memorial Award given to former MLA Shripati Shinde!
श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी यांच्यातर्फे माजी आमदार जयानंद मठकर यांच्या सातव्या स्मृती दिनाच्या निमित्ताने जयानंद मठकर स्मृती पुरस्कार गडहिंग्लजचे माजी आमदार श्रीपती शिंदे यांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शुक्रवारी श्रीराम वाचन मंदिरात आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला .समाजवादी विचारसरणीची मंडळी समाजात होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात नेहमीच आवाज उठवत असतात. त्यांचे कार्य क्रांतिकारी आणि समाजाला दिशा देणारे आहे. याच पठडीतले समाजवादी नेते, माजी आमदार श्रीपती शिंदे आहेत. त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी आहे, असे केसरकर यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस, लेखक प्रा. प्रवीण बांदेकर, कोल्हापूरचे समाजवादी नेते सुरेश शिपूरकर, मठकर यांचे सुपुत्र मिलिंद मठकर, श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावस्कर उपस्थित होते.
केसरकर यांनी जयानंद मठकर माझे मार्गदर्शक होते. मला राजकारणात शिवरामराजे भोसले यांनी आणले. परंतु मला समाजकारणाचे धडे मठकर यांच्याकडूनच मिळाले. मठकर कामगार नेते होते. परंतु वाचन चळवळीसाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यासाठी ठिकठिकाणी वाचन मंदिर सुरू केले. त्यांच्या प्रेरणेतूनच आता पुढे मी काम करत आहे. सावंतवाडी संस्थान चांगल्या विचारांची संस्कृती आहे .ही संस्कृती कोल्हापूरला जपली जाते. त्याच संस्कृतीतून श्रीपती शिंदे यांच्यासारखे कार्यकर्ते घडले. शिंदे यांचे कार्य दीपस्तंभासारखे आहे, असेही केसरकर म्हणाले.









