वृत्तसंस्था/ मेलबर्न
झिम्बाब्वेचे माजी कर्णधार अँडी पायक्रॉफ्ट हे शंभर कसोटी पूर्ण करणारा आयसीसी पॅनेलमधील चौथे सामनाधिकारी बनले आहेत. ते सध्या भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटीत सामनाधिकाऱ्यांची भूमिका बजावत आहेत.
या निवडक यादीत लंकेचे माजी खेळाडू रंजन मदुगले आघाडीवर आहेत. त्यांनी सर्वाधिक 225 कसोटीत सामनाधिकाऱ्याचे कार्य सांभाळले आहे. त्यानंतर न्यूझीलंडच्या जेफ क्रो यांनी 125 व इंग्लंडच्या ख्रिस ब्रॉड यांनी 123 सामन्यात ही भूमिका बजावली आहे. 68 वर्षीय पायक्रॉफ्ट यांनी 1983-1992 या कालावधीत झिम्बाब्वेतर्फे 3 कसोटी व 20 वनडे सामने खेळले आहेत. ‘पायक्रॉफ्ट यांनी पुरुषांच्या 238 वनडे, 174 टी-20, महिलांच्या 21 टी-20 सामन्यांत सामनाधिकाऱ्याचे काम पाहिले आहे. ‘सामनाधिकारी म्हणून जगभरातील 100 सामन्यातील प्रत्येक क्षणाचा आपण पुरेपूर आनंद लुटला. शतकी मजल मारणे हा मोठा सन्मान असून ही संधी दिल्याबद्दल मी मनापासून आभारी आहे,’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.









