मसूर : पूर्ण वेळ ग्रामसेवक मिळत नसल्याच्या निषेधार्थ सरपंच, उपसरपंच , सदस्य व पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र दिनी मसूर ग्रामपंचायतीला बेमुदत ठोकले टाळे ठोकले.
कराड उत्तर मतदारसंघातील मध्यवर्ती व राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या मसूर ग्रामपंचायतीला एक वर्षापासून प्रभारी ग्रामसेवक असल्याने सर्वसामान्य जनतेची अनेक कामे रखडत आहेत. जनतेची ससेहोलपट होत आहे. वारंवार मागणी करूनही पूर्णवेळ ग्रामसेवक मिळेना. त्यामुळे ग्रामसेवक द्या, अन्यथा महाराष्ट्र दिनी ग्रामपंचायतला टाळे ठोकू असा इशारा सरपंच, उपसरपंच व पदाधिकाऱ्यांनी काही दिवसापूर्वी प्रशासनाला दिला होता. तरीही प्रशासनाकडून यावर कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्यामुळे आज १ मे २०२३ रोजी पूर्ण वेळ ग्रामसेवक मिळत नसल्याच्या निषेधार्थ सरपंच, उपसरपंच , सदस्य व पदाधिकाऱ्यांनी मसूर ग्रामपंचायतीला टाळे ठोकले.
गेल्या एक वर्षापूर्वी येथील ग्रामविकास अधिकारी विकास स्वामी यांची बढती होऊन ते बदली होऊन गेले आहेत. मात्र, त्यांच्या जागी पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी मिळालेले नाहीत. सध्या टेंभू येथे कार्यरत असणारे ग्रामविकास अधिकारी विकास पाटील यांच्याकडे मसूरच्या ग्रामपंचायतीचा प्रभारी कारभार सोपवण्यात आला आहे. मात्र, बहुतांश वेळा ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध होत नसल्याने ग्रामपंचायतचा कारभार ठप्प झाला आहे. ग्रामविकास अधिकारी नसल्यामुळे दाखले, उतारे मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. तसेच मसूरच्या महसुलात ही म्हणावे तशी रिकवरी होत नाही, त्यामुळे विविध विकास कामे रखडली आहेत. त्यामुळे पूर्ण वेळ ग्रामसेवक मिळत नसल्याच्या निषेधार्थ सरपंच, उपसरपंच, सदस्य व पदाधिकाऱ्यांनी आज १ मे महाराष्ट्र दिनी मसूर ग्रामपंचायतीला बेमुदत टाळे ठोकले.
रस्ता रोको आंदोलनाचा इशारा
प्रशासनाने या टाळेबंदीची दखल न घेतल्यास व प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही न केल्यास, मसूर जुन्या बसस्थानक चौकात रस्ता रोको आंदोलनाचा इशारा सरपंच, उपसरपंच व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.









