पुणे : पुणे पोलिसांनी पकडलेल्या दोन दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या एकास राज्य दहशतवादी विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केलेल्या आणि सध्या न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या झुल्फिकार अली बडोदावाला (रा. ठाणे) याला आता एटीएसने ताब्यात घेतले.
काही दिवसांपूर्वी कोथरूड मधून दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांना आसरा देणाऱ्या आणि त्यांना आर्थिक पुरवठा करणाऱ्या आयटी इंजिनीरला अटक करण्यात आली. यानंतर त्यांच्या तपासात मुंबईतील मध्यवर्ती कारागृहात असणाऱ्या झुल्फिकार अली बडोदावाला याने मोहम्मद खान आणि मोहम्मद साकीला मदत केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एटीएसने त्याला एनआयच्या गुन्ह्यातून वर्ग केला आहे.
‘इसिस’च्या दहशतवादी कारवायांसाठी तरुणांना जाळय़ात ओढण्यात महाराष्ट्रातील गट सक्रिय होता. याबाबतची माहिती ‘एनआयए’ला मिळाल्यानंतर ३ जुलै रोजी मुंबई, ठाणे, पुणे येथे कारवाई करण्यात आली. ‘एनआयए’च्या पथकाने चौघांना अटक केली होती. मुंबईतून तबिश नासेर सिद्दिकी, पुण्यातील जुबेर नूर मोहम्मद शेख, अबू नुसैबा आणि ठाण्यातील शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला यांना अटक करण्यात आली होती. याच झुल्फिकार अली बडोदावाला एटीएसने ताब्यात घेतले आहे. कोंढव्यातून अटक करण्यात आलेल्या डॉ. अदनान अली सरकारचा तो नातेवाईक आहे.








