देश सोडून जाण्याच्या होता तयारीत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ईढीने 3558 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा सूत्रधार सुखविंदर सिंह खरूर आणि डिंपल खरूर यांना अटक केली आहे. दोघेही देश सोडून जाण्याच्या तयारीत होते, परंतु लुक आउट सर्क्युलरमुळे त्यांना विमानतळावरच रोखण्यात आले. व्यूनाउ मार्केटिंग सर्व्हिसेस लिमिटेड आणि याच्याशी निगडित कंपन्यांच्या विरोधात सुरु असलेल्या मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशी अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचे ईडीकडून सांगण्यात आले. अटकेनंतर जालंधर येथील न्यायालयाने दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी ईडीची कोठडी सुनावली आहे.
या घोटाळ्याला क्लाउड पार्टिकल स्कॅम नावाने ओळखले जाते. यात गुंतवणुकदांरान खोट्या ‘सेल अँड लीज-बॅक’ मॉडेलद्वारे फसविण्यात आले होते. उत्तरप्रदेशच्या गौतमबुद्धनगर पोलिसांकडून नोंदविण्यात आलेल्या एफआयआरनंतर याप्रकरणी ईडीने स्वत:चा तपास सुरु केला होता. व्यूनाउ ग्रूपचे सीईओ आणि संस्थापक सुखविंदर सिंह खरूरने स्वत:च्या सहकाऱ्यांसोबत मिळून हा घोटाळा केल्याचे ईडीच्या तपासात स्पष्ट झाले होते. क्लाउड पार्टिकल टेक्नॉलॉजीच्या नावावर गुंतवणुकदारांकडून मोठी रक्कम जमवण्यात आली, परंतु या कंपनीकडून कुठलाच व्यवसाय केला जात नव्हता. गुंतवणुकदारांची दिशाभूल करण्यासाठी कंपनीने अवास्तव उलाढाल दाखविली होती. बनावट गुंतवणूक योजनेद्वारे 3558 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे ईडीने सांगितले आहे.









