पाकिस्तानातील मशिदीत अज्ञाताकडून गोळीबार : शाहीद लतीफ हा जैश-ए-मोहम्मदचा हस्तक
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
सात वर्षांपूर्वी पंजाबमधील पठाणकोट येथे भारताच्या सेनातळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार शाहीद लतीफ ठार झाला आहे. पाकिस्तानातील सियालकोट येथील डास्का शहरातील एका मशिदीत त्याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्यांचा वर्षाव केला. त्यात तो ठार झाला. तो भारतात ‘मोस्ट वाँटेड’ सूचीतील दहशतवादी होता. तो बिलाल या टोपण नावानेही ओळखला जात असे.
तीन बंदूकधाऱ्यांनी त्याच्यावर मशिदीत तो पहाटे प्रार्थना करीत असताना गोळीबार केला. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. त्याला लक्ष्य करुन मारण्यात आले असून हा त्याच्यावरील दहशतवादी हल्लाच आहे, असे पाकिस्तानने प्रतिपादन केले आहे. 41 वर्षांचा लतीफ हा बेकायदेशीर कृत्य विरोधी कायद्याअंतर्गत (युएपीए) घोषित करण्यात आलेला दहशतवादी होता. भारताच्या गुन्हा अन्वेषण विभागाला (एनआयए) तो अनेक गुन्ह्यांमध्ये हवा होता. पठाणकोट हल्ल्यानंतर तो पाकिस्तानात पळून गेला होता. त्याआधी अनेक वर्षे तो जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी होता.
2010 मध्ये सुटका
शाहीद लतीफ याला जम्मू-काश्मीरमध्ये अनेक वर्षांपूर्वी अटक झाली होती. तथापि काँग्रेसप्रणित आघाडीच्या सरकारने त्याची 2010 मध्ये मुक्तता केली होती. त्यानंतर त्याने पाकिस्तानात राहून दहशतवादाचे आणखी प्रशिक्षण घेतले. तो जैश- ए-मोहम्मदचा हस्तक होता. त्याने पाकिस्तानकडून दहशतवादी प्रशिक्षण घेऊन 1993 मध्ये काश्मीर खोऱ्यात प्रवेश केला. 1994 मध्ये त्याला अटक करण्यात आली. जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक मसूद अझरसह तो जम्मूच्या कारागृहात होता.
मागणी फेटाळली होती
वाजपेयी सरकारच्या काळात जैशच्या दहशतवाद्यांनी भारताचे विमान पळवून त्यातील प्रवाशांसह ते अफगाणिस्तानात नेले होते. त्यावेळी विमान प्रवाशांची सुटका करुन घेण्यासाठी मसूद अझरसह काही दहशतवाद्यांची सुटका करण्यात आली होती. त्याचवेळी लतीफ आणि त्याच्या 31 सहकाऱ्यांनही मुक्त करण्याची अट दहशतवाद्यांकडून घालण्यात आली होती. तथापि, वाजपेयी सरकारने ती फेटाळली होती. त्यामुळे तो कारागृहातच होता. पुढे काँग्रेसप्रणित सरकारच्या काळात त्याची सुटका करण्यात आली होती. त्याने 2016 मध्ये पठाणकोटमध्ये गुप्तपणे प्रवेश करुन तेथील भारतीय सेनेच्या तळावर हल्ला केला होता.
कोणाचे कृत्य
त्याला कोणी ठार केले यावर आता बरीच चर्चा होत आहे. तो पाकिस्तानातीलच स्थानिक गुंड टोळीकडून मारला गेला असावा असा तर्क व्यक्त करण्यात येत आहे. पाकिस्तानात विविध दहशतवादी संघटना असून त्यांच्यात मोठ्या प्रमाणात वैर असते. त्यामुळे अशा हत्या होत असतात, असेही बोलले जाते. मात्र, अद्याप त्याची हत्या कोणी केली याचे धागेदोरे पाकिस्तान प्रशासनाला मिळालेले नाहीत, असे सियालकोट पोलिसांचे म्हणणे आहे.
नेमक्या कोणत्या संघटनेचा हस्तक
एनआयएच्या म्हणण्यानुसार तो हरकत ए जिहादी इस्लामी या दहशतवादी संघटनेचा हस्तक होता. त्यानंतर त्याने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेत पठाणकोट हल्ल्यापूर्वी प्रवेश केला होता. नंतरच्या काळात तो जैश या संघटनेचा एक महत्वाचा दहशतवादी म्हणून ओळखला जाऊ लागला होता. त्याच्या विरोधात एनआयएकडे भक्कम पुरावा असल्याचेही प्रतिपादन करण्यात येत आहे.
आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा
ड लतीफ हा प्रथम हरकत ए जिहादी इस्लामीचा, नंतर जैशचा दहशतवादी
ड पठाणकोट हल्ल्याच्या आधी त्याला पाकिस्तानात दहशतवादाचे प्रशिक्षण
ड 2010 मध्ये सुटका झाल्यानंतर पुन्हा पाकिस्तानात त्याने घेतले प्रशिक्षण









