ऑनलाईन टीम / तरुण भारत :
जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्याप्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. कालच या प्रकरणात 5 जणांना अटक करण्यात आली होती. राष्ट्रवादी आमदार सुनील शेळके यांच्यावर किशोर आवारे यांच्या आईने थेट आरोप केले होते. परंतु पोलीस चौकशीत या हत्येचा मुख्य सूत्रधार समोर आला आहे. बापाच्या कानशिलात लगावल्याच्या रागातून माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा गौरव खळदे याने ही हत्या घडवून आणली आहे. गौरवने हत्येची कबुली दिल्याचे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सांगितले.
काही महिन्यांपूर्वी तळेगाव दाभाडे जुन्या नगरपरिषद परिसरात भानू खळदे आणि किशोर आवारे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. त्यावेळी किशोर आवारे यांनी भानू खळदे यांच्या कानशिलात लगावली होती. वडिलांना मारल्याचा राग मनात धरून भानू खळदे यांचा मुलगा गौरवने आवारे यांची हत्या घडवून आणली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींनी तशी कबुली दिली असून, गौरवनेही गुन्हा मान्य केला आहे.
12 मे ला आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. तिथून बाहेर पडत असताना भरदुपारी 4 च्या सुमारास नगरपरिषदेसमोरच आवारे यांची चार जणांनी निर्घृण हत्या केली होती.









