पुणे / वार्ताहर :
तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांची पिस्तूलने गोळय़ा झाडून तसेच कोयत्याने वार करून भरदिवसा हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार माजी नगरसेवक भानू खळदे हा पसार झाला होता. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या तपास पथकाने त्याला नाशिक परिसरातून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर आवारे आणि चंद्रभान उर्फ भानू खळदे यांनी एकत्रित तळेगाव दाभाडे येथे जनसेवा विकास समिती या स्थानिक राजकीय आघाडीची निर्मिती केली होती. त्या माध्यमातून खळदे यांच्या पत्नी हेमलता खळदे या नगरसेवक पदावरही निवडून आलेल्या होत्या, तर जनसेवा विकास समितीचे सहा नगरसेवक निवडून आले होते. मात्र, त्यानंतर खळदे आणि आवारे यांच्यात वैचारिक मतभेद होऊन दोघेही विभक्त झाले होते. डिसेंबर 2021 मध्ये मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वात मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत चंद्रभान खळदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला होता. त्यापूर्वी खळदे हे काँग्रेसच्या माध्यमातून चार वेळा नगरसेवक पदावर निवडून आले होते.
डिसेंबर 2022 मध्ये वृक्षतोडीच्या प्रकरणातील वादावरून किशोर आवारे यांनी मुख्याधिकाऱयांच्या कार्यालयात चंद्रभान खळदे यांच्या कानाखाली लगावली होती. याचा राग मनात धरून खळदे यांनी आवरे यांच्या खूनाची सुपारी दिली. या प्रकरणात पोलिसांनी पाच हल्लेखोर यांना अटक केलेली आहे. बीई सिविल असलेल्या गौरव खळदे याच्या तपासात वडिलांचाही सहभाग निष्पन्न झाल्याने पोलिसांनी चंद्रभान खळदे यांचा शोध सुरू केला. मात्र, ते मागील दीड महिन्यापासून फरार झालेले होते. पोलीस पथके त्यांचा शोध घेत होते अखेर खळदे यांना नाशिकमध्ये अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.









