महाराष्ट्रात सध्या एक वर्षाच्या फरकाने शिवसेना आणि राष्ट्रवादीला फोडून भाजपने मास्टर स्ट्रोक लगावला आहे. अशक्य ते शक्य करून दाखवण्याची कामगिरी हा पक्ष किती सहजपणे पार पाडतो हे पाहून महाराष्ट्र अचंबित झाला आहे. ‘उठाकर पटक देंगे’ही भाजपा राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा शिवसेनेच्या बाबतीत खरी ठरवली. उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांचे आमदार आणि पक्ष सुद्धा काढून घेण्याचे राजकारण यशस्वी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकारने नुकतेच एक वर्ष पूर्ण केले. अशावेळी शरद पवार यांचा पक्ष फुटल्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला असे म्हटले जात आहे. वास्तविक हादरे आधीपासूनच जाणवत होते. त्यामुळे भूकंप कधीतरी होणारच होता. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने तर अजित पवारांना सत्तेत सामील होण्याचे आमंत्रण दिले होते. त्यांच्या आमंत्रणाचा मान राखत आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली जुनी दोस्ती टिकवत त्यांनी दोनदा दिल्लीवारी केली.अखेर रविवारी थेट 8 सहकाऱ्यांसह शपथ घेतली. आता तेही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असतील. किंवा महाराष्ट्राला आणखी कुठला भूकंप सहन करावा लागला तर त्यांचेही प्रमोशन होऊ शकते. त्यामुळे आधी निमंत्रण देऊन आता शिंदे गटाने नाराजी व्यक्त करण्यात अर्थ नाही. राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार आपल्या बाजूने आहेत असे सांगून दादांनी आकडा लपवला आहे. तो राज्यपालांना माहीत असावा. हा निर्णय वरिष्ठांना म्हणजे शरद पवार यांना माहिती देऊन घेतला असून आम्ही शिवसेनेबरोबर जात असू तर भाजपसोबत का नाही? असा बिनतोड प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. आगामी लोकसभा भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र लढवेल. आम्ही घड्याळाच्या चिन्हावरच लढू असे त्यांनी जाहीर केले आहे. तर दुसरीकडे कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी पक्ष फुटला असल्याची ट्विटरवरून घोषणा केली आहे. त्यामुळे शिवसेने पाठोपाठ आता शरद पवार यांनी आपण जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि सोमवारी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन महाराष्ट्र दौरा सुरू करत असल्याचे म्हटले आहे. प्रफुल्ल पटेल आणि तटकरे याना आपण नेमल्याने त्यांना काढायची कारवाई सुरू झाली. अजितदादा, भुजबळ, वळसे यांच्यासह त्यांच्यावरही कारवाई होईल. आमदारांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा पाठींबा नसून कोऱ्या पत्रावर सह्या घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर सलग दुसऱ्या वर्षी झालेली ही आमदारफुटी आणि सत्तेची अतिवृष्टी महाराष्ट्रातील जनतेच्या मेंदूला कशी पेलवणार आहे, कुणास ठाऊक. गतवर्षी आमदार फुटल्यानंतर शेतकऱ्यांनी बैलांच्या पाठीवर आपल्या प्रतिक्रिया लिहिल्या होत्या. आता उद्या राजकारणातील ‘कर‘ कुठल्या कुठल्या गावात तोडली जाते या चर्चेतच महाराष्ट्राचा बैलपोळा साजरा होणार आहे. शरद पवार यांनी देशाच्या आणि राज्याच्या राजकारणातील असलेली स्थिती आणि त्यांच्या सहकारातील नेत्यांना जपण्यासाठीच्या अपरिहार्यतेतून जे संदिग्ध राजकारण केले, सत्ता पक्षाशी जोडून राहण्याचा प्रयत्न केला, त्याचा फटका त्यांच्या पक्षाला 2018-19 नंतर पुन्हा एकदा बसला आहे. गेल्यावेळी एकाकी झुंज देऊन त्यांनी राज्यातील वातावरण बदलले. पण तेव्हा सोबतीला असणारे पुतण्यासहित प्रमुख साथीदार सुद्धा यावेळी त्यांना सोडून गेले आहेत. आता पवारांना 1980 सालची मोठी फूट आणि त्यातील 48 पराभूत झाले आणि आपण69 आमदार आणले हे आठवून शरण जायला तयार नाही हेच दाखवले आहे. आता पवारांचे वय पवारांच्या विरोधात उभे राहिले आहे. कधीकाळी महाराष्ट्रातील सर्वात तरुण मुख्यमंत्री आणि आजचे सर्वात ज्येष्ठ नेते शरद पवार या आव्हानाला कसे पेलणार? याकडे ग्रामीण महाराष्ट्राचे आणि 2019 नंतर प्रेमात पडलेल्या शहरी भागाचे लक्ष लागले आहे. तो वर्ग पवारांकडे आता सहानुभूतीने पाहील का? आता एकमेव काँग्रेस फुटण्यापासून टिकला असला तरी सुटलेला नाही. तिथेही अशीच स्थिती आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत शिवसेनेने मोर्चा काढून कालच आपली स्वतंत्र वाटचाल सुरू केली होती. आता त्यांच्या शरद पवारांशी तारा पुन्हा जुळू लागतील. संजय राऊत यांनी तशी सुरुवातही केली. पवारांच्या आधी त्यांनीच ट्विट केले. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, वळसे-पाटील यांच्यासारखे ज्येष्ठ, विधानसभा उपाध्यक्ष नाना झिरवळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे आणि युवा आमदार सुद्धा अजित पवार यांच्याबरोबर शपथविधीला हजर होते. त्यामुळे आता ते परततील का? हा प्रश्नच आहे.
भाजपच्या मतदारांसाठी सुद्धा हा मोठा धक्का आहे. हा मास्टर स्ट्रोक त्यांना कितपत पेलवतो, ते सुसंस्कृत राजकारणाला कितपत विसरतात हे पहावे लागेल. अर्थात एकनाथ शिंदे गटाला अपेक्षित मते मिळत नाहीत म्हणून राष्ट्रवादीच्या प्रबळ गटाला फोडून घेण्यात भाजपने शक्ती खर्ची घातली आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने विरोधकांचे पारिपत्य करण्यासाठी ही कृती आवश्यक होती असे ते आपल्या मतदाराला सांगतील. फडणवीसांवर विसंबून राष्ट्रवादीचे आमदार सत्तेत येणार नाहीत म्हणून अजितदादांना दिल्लीच्या नेत्यांना भेटवले. मोदींनी अजित पवारांच्या 70 हजार कोटीच्या घोटाळ्याचा उल्लेख दोनच दिवसांपूर्वी केला होता. तो इशाराच होता. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल चकार शब्द काढला नाही. त्यामुळे भाजप सोबत जायचे तर आत्ताच संधी आहे. नाहीतर घोटाळ्यांच्या चक्कीत पिसावे लागेल आणि उद्धव ठाकरे पुन्हा युती करून मोकळे होतील, या दबावातून अजित पवारांनी तात्काळ निर्णय घेतला. सहा जुलै रोजी होणारी पक्षाची बैठक पार पाडण्यासाठीही ते थांबले नाहीत. शरद पवार सकाळी त्यांच्या प्रतीक्षेत होते पण दादा तिकडे फिरकले नाहीत आणि आमदारांची मात्र बैठक झाली. ती सुद्धा अचानक होऊन त्याला ‘बहुतांश‘ आमदार उपस्थित होते! आता शिंदेंचे काय होणार, अपात्र ठरतील का? नाही ठरले तर दोन उपमुख्यमंत्री होणार की ,फडणवीस दिल्लीला जाणार या प्रश्नांनी सर्वांना भंडावून सोडले आहे. या गुंत्यातून महाराष्ट्र सुटेपर्यंत आणखी काय काय भूकंप होतात आणि आणखी कुणाचे मास्टर स्ट्रोक बसतात, कितीजण यातून रुसून नवा तंबू शोधतात हे बघत बसायचे.