आमदार दिगंबर कामत यांनी दिली माहिती : वर्षभरात एकूण 130 कोटींची विकासकामे मार्गी
मडगाव : मडगाव शहरासाठी आत्ता मास्टर प्लॅन तयार होत आहे. या मास्टर प्लॅनमध्ये शहराच्या सर्वागिण विकासाचा समावेश केला जाणार असल्याची माहिती मडगावचे आमदार दिंगबर कामत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. मडगाव मतदारसंघात गेल्या वर्षभरात एकूण 130 कोटींची विकासकामे मार्गी लागल्याची माहिती त्यांनी दिली. जीएसआयडीसी मार्फत 82 कोटी व इतर 50 कोटींची कामे करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. यात वीज खात्या तर्फे 37.45 लाखांची कामे करण्यात आली आहेत. मडगाव शहरात भूमीगत वीज वाहिन्या टाकण्यात आल्या असून सबस्टेशन उभारण्यात आलेली आहे. त्यामुळे सहसा मडगावात वीज पुरवठा खंडित होत नसल्याचे सांगण्यात आले. गोवा पयंटन विकास महामंडळा तर्फे 66.35 लाखांची कामे करण्यात आली आहेत.
जलस्त्रोत खात्या तर्फे 7,33,96,336 रूपयांची कामे करण्यात आली आहे. क्रीडा आणि युवा व्यवहार खात्या तर्फे 1,70,32,517 रूपयांची कामे करण्यात आली आहे. फातोर्डा-मडगाव येथील जलतरण तलावाचे काम ही लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती आमदार दिगंबर कामत यांनी दिली. वन खात्या तर्फे रू. 1,41,60,000ची कामे करण्यात येत आहे. त्यात आनाफॉन्त गार्डनचा समावेश असून हे काम सद्या सुरू आहे. म्युझिकल फाऊंटेन हे आनाफॉन्त गार्डनचे वैशिष्ठ्या असून संपूर्ण गोव्यात अशी सुविधा असलेले एकमेव गार्डन आहे. या ठिकाणी पूर्वी विविध कार्यक्रम व्हायचे. मात्र, मध्यंतरी या गार्डनकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे येथील कार्यक्रम बंद पडले होते. या गार्डनचे नूतनीकरण पूर्ण झाल्यावर पुन्हा एकदा लोकांना संध्याकाळच्या वेळी मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्याची संधी मिळणार असल्याची माहिती श्री. कामत यांनी दिली. मडगाव नगरपालिकेच्या इमारतीचे पूर्णपणे नूतनीकरण करण्यात येईल. मडगावच्या मास्टर प्लॅनमध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. मडगावच्या मोती डोंगरावर आयुष्य हॉस्पिटलचे काम पूर्णत्वाकडे जात असून त्याचे ही लवकरच उद्घाटन होणार असल्याची माहिती देण्यात आली. श्रीपाद नाईक हे केंद्रात आयुष्यमंत्री असताना त्यांनी या हॉस्पिटलसाठी मान्यता दिली होती. सोनसोड्यावरील कचरा व्यवस्थापनावर बोलताना श्री. कामत म्हणाले की, येत्या तीन-चार महिन्यात निकाल बघायला मिळेल. सोनसोड्यावरील कचरा हटविण्याचे काम सुरू आहे. दररोज पाच-सहा ट्रक प्रक्रिया केलेला कचरा हटविला जात आहे.
पार्किग प्रकल्प ही येणार
मडगाव शहरात पार्किगची गंभीर समस्या आहे. याची कल्पना आपल्याला आहे. ही समस्या दूर करण्यासाठी मडगावच्या जुन्या मासळी मार्केट येथे पार्किग प्रकल्प उभारला जाणार आहे व त्या संदर्भातील सोपस्कार पूणे होत असल्याचे सांगण्यात आले. जीसुडा तर्फे लवकरच निविदा जारी केली जाणार आहे. कोंब परिसरात उ•ाणपूल उभारण्याचा प्रस्ताव असून त्यालाही मान्यता मिळणार असल्याची माहिती देण्यात आली. हा पूल तीन ठिकाणी जोडला जाणार आहे. त्यामुळे स्थानिक लोकांची गैरसोय होणार नाही तसेच एकही घर पाडावे लागणार नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. या पत्रकार परिषदेला मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, उपनगराध्यक्ष दिपाली सावळ, मडगाव भाजप मंडळाचे अध्यक्ष रूपेश महात्मे, नगरसेवक सगूण नाईक, महेश आमोणकर, सिद्धाथ गडेकर, श्री. वरक, सदानंद नाईक, बबिता नाईक, कामिलो बार्रेटो व इतर नगरसेवकांची उपस्थिती होती.









