दिवाळी हंगामाचा लाभ उठविण्याचा खटाटोप : उत्सव स्पेशल रेल्वे सोडण्याची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
दिवाळीसाठी गावी परतणाऱ्या नागरिकांना तिकीट दरातील वाढ मारक ठरत आहे. खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी तिकीट दरात भरमसाट वाढ केल्याने प्रवाशांना दुप्पट दराने तिकीट खरेदी करून प्रवास करावा लागणार आहे. परिवहन मंडळाच्या मर्यादित बससेवा, रेल्वेचे हाऊसफुल्ल बुकिंग यामुळे खासगी ट्रॅव्हल्सशिवाय नागरिकांकडे पर्याय नसल्याने याचाच फायदा घेत तिकीट दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
गावी परतण्यासोबतच पर्यटनासाठी निघालेल्या प्रवाशांना वाढीव दराचा फटका बसणार आहे. बेळगाव परिसरातील अनेक नागरिक मुंबई, पुणे, हैद्राबाद, बेंगळूर, म्हैसूर या ठिकाणी नोकरी, व्यवसाय, शिक्षणानिमित्त ये-जा करतात. दिवाळीच्या सुटीमध्ये गावी परतणाऱ्यांची संख्या मोठी असते. परंतु, यावर्षी खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी तिकीट दरात मोठी वाढ केल्याने प्रवाशांना फटका बसणार आहे.
रेल्वेचे बुकिंग फुल्ल
दसऱ्यापूर्वीच दिवाळीच्या दरम्यानचे रेल्वेचे तिकीट बुकिंग फुल्ल झाले होते. मुंबई, बेंगळूर, दिल्ली, पुणे, तिरुपती येथून बेळगावला येणाऱ्या एक्स्प्रेसचे बुकिंग फुल्ल झाल्याने नागरिकांना परिवहन मंडळाच्या अथवा खासगी टॅव्हल्सवर अवलंबून रहावे लागणार आहे. परिवहन मंडळाच्या मर्यादित बससेवा असल्याने दुप्पट दराने का होईना, पण खासगी टॅव्हल्सने प्रवास करण्याची वेळ आली आहे.
पर्यटनासाठी जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ
दसऱ्याप्रमाणेच नैत्य रेल्वेने मुंबई व बेंगळूर या दोन्ही मार्गांवर उत्सव स्पेशल रेल्वे सुरू करण्याची मागणी प्रवाशांतून केली जात आहे. दसऱ्यानिमित्त सोडण्यात आलेल्या जादा एक्स्प्रेसला तुफान प्रतिसाद मिळाल्याने दिवाळीच्या कालावधीतही अशा स्पेशल एक्स्प्रेस सोडण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे. दिवाळीत जोडून सुट्ट्या आल्याने पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्याही अधिक प्रमाणात आहे. यामुळेच हैद्राबाद-तिरुपती या एक्स्प्रेसचे बुकिंगही सुरू आहे.
खासगी ट्रॅव्हल्स तिकीट दरातील वाढ
शहर पूर्वीचा तिकीट दर सध्याचा तिकीट दर
पुणे-बेळगाव 700 ते 800 1000 ते 1500
मुंबई-बेळगाव 1000 ते 1200 1400 ते 2000
हैद्राबाद-बेळगाव 1000 ते 1300 1500 ते 2000
बेंगळूर-बेळगाव 1000 ते 1200 1500 ते 2000









