चीन-पाकिस्तान महामार्गावर हजारोंची निदर्शने
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पकिस्तानने बेकायदेशीररित्या बळकाविलेल्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान सरकारच्या विरोधात प्रचंड जनक्षोभ उसळल्याचे दिसून येत आहे. गेले तीन दिवस हजारोंच्या संख्येने आंदोलन करणाऱ्या लोकांनी चीन-पाकिस्तान महामार्ग रोखून धरल्याने या दोन्ही देशांमधील वाहतूक ठप्प झाली आहे. पाकिस्तानातील शहाबाझ शरीफ सरकारच्या व्यापार धोरणाच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे.
जनतेचे हे उग्र आंदोलन पाकव्याप्त काश्मीरमधून जाणाऱ्या आणि पाकिस्तान आणि चीन यांना जोडणाऱ्या काराकोरम मार्गावर होत आहे. गिलगिट-बाल्टिस्तान या प्रदेशांमधून हा मार्ग जातो. हा मार्ग पाकिस्तान आणि चीनच्या संयुक्त प्रकल्पाचा भाग आहे. सलग तीन दिवस हा मार्ग बंद ठेवण्यात आंदोलकांना यश आले आहे. या आंदोलनाला पाकव्याप्त काश्मीरातील जवळपास सर्व व्यापारी संघटना आणि स्थानिक राजकीय पक्षांचे समर्थन असल्याचे दिसून येत आहे.
गुलमतनगर येथे तीव्र आंदोलन
बाल्टिस्तान येथील गुलमतनगर येथे हजारोंच्या संख्येने नागरीकांनी सोमवारी महामार्गावर उतरुन आंदोलन केले. या आंदोलकांमध्ये महिलांची संख्या मोठी होती. पाकिस्तान सरकारच्या व्यापार धोरणामुळे पाकव्याप्त काश्मीरची मोठी हानी होत असून पंजाब प्रांताचा लाभ होत आहे. पाकिस्तानच्या सरकारवर पाकिस्तानातील पंजाबींचा पगडा असून ते केवळ त्यांच्या लाभाचे राजकारण करतात, असा आंदोलकांचा आरोप आहे. पाकव्याप्त काश्मीरच्या स्थानिक जनतेवर यामुळे अन्याय होत असून पाकिस्तानच्या सरकारने हे व्यापार धोरण हेतुपुरस्सर लागू केल्याचा आरोपही आंदोलक संघटनांनी केला आहे. तथापि, पाकिस्तान सरकारचे व्यापार धोरण हे केवळ एक तात्कालीक कारण आहे. पाकिस्तान सरकारच्या विरोधात या भागात गेली अनेक दशके असंतोष धुमसत आहे, असे अनेक जाणकारांचे म्हणणे आहे. या असंतोषाचा आता भडका उडाला असून पाकिस्तान सरकारने हे अन्यायी धोरण असेच पुढे चालविले, तर हा भाग पाकिस्तानपासून वेगळा झाल्याशिवाय रहाणार नाही, असा इशारा पाकिस्तानातीलच लोकच आता देत आहेत.
धोरणाला विरोध का…
शहाबाझ शरीफ सरकार चीनच्या हातातील बाहुले आहे. काराकोरम मार्गाच्या आसपासच्या भागात पाकिस्तान सरकारने पंजाबी नागरीकांची वस्ती वाढविण्याचा प्रयत्न चालविला आहे. याला स्थानिक नागरीकांचा विरोध आहे. पंजाबी मुस्लीम नागरीकांमुळे स्थानिकांच्या संस्कृतीवर परिणाम होत असून ती धोक्यात आली आहे, असा स्थानिकांचा आरोप आहे. पाकिस्तान सरकारच्या व्यापारी धोरणाला लाभ स्थानिक व्यापाऱ्यांना मिळत नसल्याने त्यांनी आंदोलन चालविले आहे. पाकव्याप्त काश्मीरची लोकसंख्या चाळीस लाखांच्या आसपास आहे. या आंदोलनात विद्यार्थी आणि युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे.









