1400 एकर जमीन धनदांडग्यांनी बळकावली : महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचाही सहभाग
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या मरणहोळ या गावामध्ये 1400 एकर जमीन घोटाळा झाला आहे. गावासाठी राखीव ठेवलेल्या इनामी जमिनीवर काही धनदांडग्यांनी आपली नावे चढविली आहेत. यामुळे मागील शंभर वर्षांपासून शेती करणारे शेतकरी तसेच गावकरी भूमीहीन होणार असल्याने या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मरणहोळ ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली. शुक्रवारी सुवर्ण विधानसौध परिसरात भव्य आंदोलन करून मागण्या मान्य होणार नाहीत, तोवर आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.
मरणहोळ हे सीमावर्तीय गाव असल्याने येथील गावकरी हे मराठी भाषिक आहेत. कन्नड भाषेचे ज्ञान नसल्याचा फायदा घेत दलित व कृष्णगवळी हणबर समाजाकडे असलेली जमीन धनदांडग्यांच्या नावे चढविण्याचा प्रकार करण्यात आला आहे. 1930 पासून या इनाम जमिनी शेतकरी कसत आहेत. परंतु, महसूल खात्यातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी सरकारी कागदपत्रे गहाळ करून बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनी हडपण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या व्यक्तींच्या नावावर इनाम जमीन करण्यात आली, त्यांना ही जमीन आहे कोठे? हेच माहीत नाही. तरीदेखील एकाच कुटुंबातील व्यक्तेंनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन जमीन मंजूर करून घेतली आहे.
चिक्कमंगळूर येथे झालेल्या 6 हजार एकर अक्रमसक्रम जमीन घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी ज्या प्रकारे न्यायालयातर्फे चौकशी झाली, त्याचप्रकारे मरणहोळ येथील 1400 एकर जमिनीची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. सर्व्हे क्र. 24, 25 व 33, 34 मधील जमीन हडपण्याचा प्रकार झाला असून यामुळे गावातील दीडशे ते दोनशे कुटुंबांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे आमच्या हक्काची जमीन आमच्या नावे करा, अशी मागणी मरणहोळ ग्रामस्थ तसेच केआरएस पार्टीच्यावतीने करण्यात आली.
मरणहोळ गावापासून पदयात्रा
आपल्या हक्काची जमीन आपल्याला मिळावी, यासाठी मरणहोळ ग्रामस्थांनी 70 किलोमीटरचा पायी प्रवास करत सुवर्ण विधानसौधसमोर धरणे आंदोलन केले. बुधवार दि. 6 पासून या पदयात्रेला सुरुवात झाली. गावातील महिला, पुरुष, विद्यार्थी या पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते. जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी तसेच राजकारण्यांना विनंती करूनदेखील त्यांनी यामध्ये लक्ष न दिल्याने आता राज्य सरकारने तरी आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी मरणहोळ ग्रामस्थांनी केली आहे.
महसूल खात्याचा भ्रष्टाचार
बेळगाव तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असणाऱ्या मरणहोळ गावात जमीन हडपण्याचा प्रकार झाला आहे. मागील शंभर वर्षांपासून कसणाऱ्या शेतकऱ्यांची जमीन काही महसूल विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपल्या नावे करण्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये महसूल खात्यातील बरेच अधिकारी समाविष्ट असून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी मरणहोळ ग्रामस्थांनी केली.









