वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी : लाखोंचे नुकसान
इचलकरंजी : इचलकरंजी येथील सांगली रोडवरील वृंदावन कॉ लनीतील एका दुमजली इमारतीत गुरुवारी पहाटे गॅस गिझरमधून झालेल्या गळतीमुळे भीषण स्फोट होऊन परिसर हादरला. या घटनेत आण्णासो आप्पू आंदरघिसके (वय ७५) आणि त्यांची पत्नी मनिषा आण्णासो आंदरघिसके (वय ६८) हे वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर स्फोटामुळे घराचे आणि आसपासच्या मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सांगली रोडवरील वृंदावन कॉलनीमध्ये आंदरघिसके कुटुंब दुमजली इमारतीत वास्तव्यास आहे. गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास आण्णासो आंदरघिसके हे नेहमीप्रमाणे फिरायला जाण्यासाठी उठले होते. त्याचवेळी अचानक मोठा स्फोट झाला आणि संपूर्ण परिसर दणाणून गेला. स्फोटाच्या आवाजाने आसपासची घरे हादरली. दुसऱ्या मजल्यावर राहणारे मुलगा निशांत, सुन नम्रता आणि नातवंडांनी खाली धाव घेतली. या स्फोटात आण्णासो आणि मनिषा आंदरघिसके गंभीर जखमी झाले.
त्यांना तातडीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी सांगली सिव्हील रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसर सुरक्षित करून मदतकार्य सुरू केले. अग्निशमन दलाचे जवान तुषार हेगडे यांनी प्रसंगावधान दाखवत घरातील गिझर आणि स्वयंपाक घरातील सिलिंडर बाहेर काढले.
पोलिस उपाधिक्षक विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक महेश चव्हाण, महापालिका अग्निशमन दलाचे अधिकारी साळुंखे आदींसह गॅस कंपनीच्या प्रतिनिधींनीही घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. तर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करून माहिती घेतली. या घटनेमुळे वृंदावन कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, गॅस लिकेज होऊन हा स्फोट झाला असावा, असा अंदाज पोलीस अधिकाऱ्यांनी वर्तवला. याबाबत अधिक तपास सुरू असून, स्फोटाचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यांनी तत्परतेने आंदरघिसके कुटुंबाच्या मदतीला धावून आले. नागरिकांनी पुढाकार घेत नुकसानग्रस्त साहित्य हटविण्याचे काम सुरू केले.
स्फोटाची भीषणता
स्फोट इतका तीव्र होता की, एखादा मोठा बॉम्ब स्फोट झाल्यासारखा भास झाला. या स्फोटात घराच्या भिंतींना तडे गेले. काचा फुटल्या आणि संरक्षक भिंतही पडली. घरातील प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले. दारात उभ्या तीन दुचाकीवर भिंत कोसळल्याने त्यांचे नुकसान झाले, तर उडून गेलेले लोखंडी गेट शेजारील रिक्षावर पडले. या स्फोटामुळे आंदरधिसके यांच्या शेजारील यंत्रमाग कारखान्याच्या भिंती आणि पत्र्यांचे शेडही कोसळले. परिसरात काही काळ भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.








