मंडणगड प्रतिनिधी
तालुक्यातील वाल्मिकीनगर येथे गुरूवारी किराणा व जनरल स्टोअरसोबतच मेडिकल स्टोअरला भीषण आग लागून दोन्ही दुकाने पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या दुर्घटनेत सुमारे 70 लाखांचे नुकसान झाले आहे. मात्र आग नक्की कशामुळे लागली हे समजू शकलेले नाही.या घटना महसूल प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार वाल्मिकीनगर पीर मोहल्ला येथील यासीन आमदानी यांच्या रॉयल जनरल आणि किराणा स्टोअर्सला गुरुवारी आचानक आग लागली. आगीचे स्वरूप एव्हढे भीषण होते की, या दुकानाजवळ असलेल्या मेडिकल स्टोअरसुद्धा या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आग लागल्याचे समजता परिसरातील वेसवी, बाणकोट, वाल्मिकीनगर येथील नागरिकांनी आपापल्यापरीने आग आटोक्यात आणण्याचा अथक प्रयत्न केला. मात्र या आगीमध्ये दोन्ही दुकानातील संपूर्ण फर्निचर व वस्तू खाक झाल्या.
या आगीमध्ये किराणा दुकानातील दोन कुलर फिजर पूर्ण जळून खाक होऊन 72 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच दुकानातील 3 लाख रुपये किमतीचे फर्निचर पूर्णपणे जळून नष्ट झाले आहे. दुकानातील इतर साहित्याचे सुमारे 10 लाख रुपये असे एकूण 13 लाख 72 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच करीम मोहम्मद आमदनी यांच्या रॉयल मेडिकल या दुकानातील मेडिकल साहित्य व औषधे यांचे 35 लाख रुपये व 7 लाख रुपयांचे फर्निचर जळून खाक झाले आहे. मेडिकल स्टोअरमधील तीन फ्रिज, एक प्रिंटर, एसी, इन्व्हर्टर, सीसीटीव्ही कॅमेरे यांचे सुमारे 3 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. असे एकूण या मेडिकल दुकानाचे सुमारे 45 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अशाप्रकारे किराणामाल व मेडिकल दुकान या दोन्ही दुकानांचे सुमारे 68 लाख 72 हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचा पंचनामा महसूल प्रशासनामार्फत करण्यात आला आहे.यासंदर्भात बाणकोट सागरी पोलीस ठाणे व विद्युत वितरण कंपनी यांच्याकडूनही पंचनामा करण्यात आला आहे.