महाड एम.आय.डी.सी.मधील मल्लक कंपनीला भीषण आग; आगीनंतर झालेल्या स्फोटाने औद्योगिक परिसर हादरला; मल्लक कंपनीसह परिसरातील तेरा जण किरकोळ जखमी
रायगड- प्रतिनिधी
महाड एम.आय.डी.सी.आज पुन्हा एकदा स्फोटाच्या दणक्याने हादरून गेली. येथील मल्लक स्पेशलिटी कंपनीला आज सकाळी भीषण आग लागली. या आगीनंतर कंपनीत स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता भयानक असल्याने सुमारे आठ किमीचा परिसराला दणके बसले. इमारतीचे तुकडे आणि लोखंडी तुकडे देखील दोन किमी अंतरावर जावून पडले. आग विझवण्याचे काम सुरु असतानाच स्फोट झाल्याने कंपनीचे तसेच शेजारील कंपन्यांमधील असे एकूण तेरा जण जखमी झाले आहेत.
पहा Video >>>> महाड MIDC मध्ये रंग तयार करणाऱ्या कारखान्यात भीषण आग
महाड औद्योगिक वसाहतीमध्ये पिग्मेन्ट रंगाची निर्मिती करणाऱ्या कारखान्यात सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीने कंपनीच्या एका प्लांटला क्षणातच विळखा घातला. आग लागल्याचे समजताच कंपनीच्या कामगारांनी आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न केले , मात्र त्याचवेळेस प्लांटमधील एका रिऍक्टरने पेट घेतल्यामुळे प्रचंड स्फोट झाला. या स्फोटामुळे महाड औद्योगिक परिसर चांगलाच हादरला. स्फोटाच्या दणक्याने कंपनीच्या प्लांटची इमारत पूर्णपणे कोसळली. या कोसळलेल्या इमारतीचे तुकडे परिसरात जावून पडले. कंपनी पासून काही अंतरावर असलेल्या असलेल्या प्रीव्ही, श्रीहरी आणि सिद्धार्थ या कंपन्यांच्या खिडक्या खळकन मोडून पडल्या. तर रिऍक्टर सह अन्य लोखंडी तुकडे सुमारे दोन किमी अंतरापर्यंत उडाले. स्फोट झाल्याने आग आणखीनच भडकली. कंपनीच्या दोन प्लांटला आगीने विळखा दिला. यामुळे आकाशात धुराचे लोट दिसून येत होते. आग लागताच कंपनीतील कामगारांनी कंपनी बाहेर धाव घेत सुरक्षित स्थळ गाठले. आग विझवण्यासाठी मेहनत घेणारे कामगार आणि महाड नगर पालिका, महाड औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन दलाने प्लांटचा ताबा घेतला. मात्र याचवेळी स्फोट झाल्याने आग विझवणारे कामगार आणि परिसरातील कंपन्यांतील कामगारांनी देखील कंपनी बाहेर पळ काढला.
आग विझवण्यासाठी महाड नगर पालिका, महाड औद्योगिक विकास महामंडळाचे अग्निशमन दल यांसह खेड, रोहा नागोठणे, या ठिकाणाहून अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. दोन तासानंतर आग नियंत्रणात आणली गेली मात्र ज्या ठिकाणी आग लागली त्याठिकाणी घातक रसायनांचा साठा आणि प्लांट असल्याने अग्निशमन दलाव्यतरिक्त अन्य व्यक्तींना प्रवेश निषिद्ध करण्यात आला.
ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणी इथाईल ऑक्साईड चा प्लांट आहे. या प्लांटचे तापमान वाढू लागल्याने कंपनी प्रशासनासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला. स्फोट झाल्यानंतर झालेल्या धावपळीत कंपनीच्या सुरक्षा विभागाचे कामगार आणि शेजारील कंपन्यांमधील कामगार जखमी झाले. जवळपास १३ जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली. या तेरा जणांवर महाड उत्पादक संघटनेच्या रुगणालयात उपचार करून सोडण्यात आले.
स्फोटाने परिसर हादरला
मल्लक स्पेशालिटी प्रा.ली.या कंपनीच्या प्लांटमध्ये आग लागल्यानंतर सुरवातीला आग किरकोळ असल्याचे दिसून येत होते मात्र या आगीत स्फोट झाल्याने इमारत कोसळली. इमारतीचे तुकडे जवळच असलेल्या प्रीव्ही, श्रीहरी या कंपन्याच्या आवारात जावून पडले. स्फोटाच्या आवाजाने शेजारील कंपन्यांच्या खिडक्यांच्या काचा देखील तुटल्या. तर महाड शहरात देखील या स्फोटाचे हादरे जाणवले. शेजारील कंपन्यांतील कामगारांना देखील कंपनी बाहेर सुरक्षित स्थळी हलवण्यात आले तर ज्या कंपन्यांना या स्फोटाचा दणका बसला त्या कंपन्यांतील कामगारांना देखील सोडून देण्यात आले. या स्फोटाच्या आवजाने काही अंतरावर असलेल्या जिते, टेमघर, नडगाव, बिरवाडी, कुसगाव, आसनपोई बिरवाडी आदी गावातील नागरिक भयभीत झाले असून आगीवर नियंत्रण आणण्यास प्रशासनाने अथक मेहनत घेतली. नागरिकांना घाबरून न जाण्याच्या सूचना देण्यात दिल्या. आग आणि स्फोटाने महाड औद्योगिक परिसर हादरून गेल्याची घटना घडताच महाड उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्यासह तहसिलदार सुरेश काशीद, नायब तहसीलदार प्रदीप कुडळ, औद्योगिक पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मारुती आंधळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या भीषण स्फोटाच्या घटनेमुळे महाड औद्योगिक वसाहतीमधील कामगारांच्या सुरक्षतेतेचा प्रश्न उपस्थित झाला असून अनेक कंपन्यातून सुरक्षिततेचा अभाव असल्याने भविष्यात फार मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एम.आय.डी.सी. रस्त्याच्या कामाचा मदत कार्यात अडथळा
ज्या मार्गावरून अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका धावत होत्या त्या रस्त्याचे काम सुरु आहे. जागोजागी खोदकाम केलेले असून पोलिसांनी वाहतुकीचे योग्य नियोजन केले नसल्याने मदतकार्यात अडथला निर्माण होत होता.