नवी दिल्ली : येथील प्रसिध्द चांदणी चौकातील भगीरथ पॅलेस परिसरातील घाऊक बाजारात लागलेल्या भीषण आगीत सुमारे 100 दुकाने जळून खाक झाली असून कूलिंग ऑपरेशन्स सुरू आहेत. यासंबंधित माहीती पोलिसांनी दिली असून कोणतीही जिवितहानी झाली नसल्याचे समजते.
चांदणी चौकातील महालक्ष्मी मार्केटमधील एका दुकानात आग लागली आणि ती आग काही वेळातच शेजारील दुकानांमध्ये पसरली. या मार्केटमधील इलेक्ट्रिकल उपकरणांच्या दुकानामुळे जळणाऱ्या प्लास्टिक आणि रबरच्या विषारी दुर्गंधीमुळे हवा प्रदूषित झाल्याने पांढरा धूर आकाशात उंचावर पसरला होता. या आगीत पाच मोठ्या इमारती प्रभावित झाल्या असून त्यापैकी तीन कोसळल्या आहेत. अग्निशमन विभागाच्या ४० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या 22 अग्निशमन दल कूलिंग प्रक्रियेत गुंतले आहेत.
या आगीमुळे व्यापारांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले असले तरी कोणतीही जिवित हानी नसल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले.