फटाक्याच्या ठिणगीने पेटला ऊस; शेतकऱ्यांचे पाच लाखांचे नुकसान
सातारा : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील हनुमाननगर परिसरात उसाच्या शेताला लागलेल्या भीषण आगीत सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. बाबुराव दिनकरराव बर्गे आणि जयवंत रामचंद्र बर्गे यांच्या दोन एकर शेतातील आडसाली ऊस काही क्षणातच जळून खाक झाला.
प्राथमिक माहितीनुसार, लहान मुले फटाके फोडत असताना ठिणगी उसाच्या शेतात पडल्याने ही आग भडकली. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत घरातील कूपनलिकांच्या सहाय्याने पाण्याचा फवारा मारत आग नियंत्रणात आणली.
या आगीत सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. कारखाना सुरू होण्यापूर्वीच तोडणीला आलेला ऊस जळाल्याने शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे.








