विद्युत तारेच्या साहाय्याने विद्यार्थ्यांनी केला बचाव : कोचिंग सेंटरमध्ये 400 विद्यार्थी उपस्थित
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
दिल्लीतील मुखर्जी नगर येथील एका कोचिंग सेंटरला भीषण आग लागल्याची घटना गुऊवारी घडली. इमारतीमध्ये आग भडकत असल्याची माहिती मिळताच कोचिंग सेंटरमध्ये उपस्थित असलेल्या मुलांनी विद्युत तारेच्या मदतीने तिसऱ्या मजल्यावरील खिडक्मया आणि बाल्कनीतून उडी मारून आपला जीव वाचवला. त्याचवेळी अग्निशमन दलानेही घटनास्थळी पोहोचून विद्यार्थ्यांची सुटका केली. काही विद्यार्थी जखमी झाल्याचे वृत्त आहे. आगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच व्हिडिओमध्ये विद्यार्थी वायरच्या साहाय्याने खिडकीतून खाली उतरताना दिसत आहेत. प्राथमिक तपासाअंती तिसऱ्या मजल्यावरील इलेक्ट्रिक मीटरमध्ये शॉर्टसर्कीट झाल्याने आगीचा भडका उडाल्याचे स्पष्ट झाले. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 11 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या मदतीने सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याने यात कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद झालेली नाही. तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याने काही विद्यार्थ्यांना दुखापत झाली आहे. बत्रा सिनेमाजवळ ग्याना बिल्डिंगमध्ये ही घटना घडली असून याप्रसंगी जवळपास 400 विद्यार्थी उपस्थित होते.









