घर आगीच्या भक्ष्यस्थानी : स्वयंपाक करताना आग लागल्याचा संशय
बेळगाव : अनंतशयन गल्ली येथील एका घराला भीषण आग लागल्याने या दुर्घटनेत संपूर्ण घरच आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. रविवारी दुपारी 1.30 च्या सुमारास ही घटना घडली असून या प्रकरणी खडेबाजार पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. याबाबत पोलिसातून समजलेले अधिक माहिती अशी, शशिकला अप्पासाहेब अंकले (रा. अनंतशयन गल्ली) या राहत असलेल्या घराला आग लागली आहे. शशिकला या अविवाहित असून त्या काहीशा मानसिक अस्वस्थ असून एकट्याच घरी राहतात. रविवारी दुपारी 1.30 दरम्यान घराला अचानक आग लागली. सदर घर अत्यंत जुने व लाकडी साहित्याने बनविण्यात आले असल्याने काही क्षणातच संपूर्ण घराने पेट घेतला. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केल्याने गल्लीतील रहिवाशांची धावपळ उडाली.
ही माहिती समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याच्या बंबासह घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा करून आग आटोक्मयात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, घरातील लाकडी साहित्याने पेट घेतल्याने जवळपास तीन तास आग आटोक्मयात आली नाही. सातत्याने पाण्याचा मारा करण्यात आला. मात्र, तोपर्यंत संपूर्ण घर व घरातील साहित्य जळून खाक झाले. या दुर्घटनेत किमती साहित्याचे नुकसान झाले नसले तरी संसारोपयोगी साहित्य व संपूर्ण घर मात्र आगीच्या भक्षस्थानी पडले. स्वयंपाक करताना ही आगीची घटना घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती समजताच खडेबाजार पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आनंद आदगोंड व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेच्या पार्श्वभूमीवर गल्लीकडे येणारे दोन्ही बाजूचे रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले. घटनास्थळी बघ्यांचीदेखील मोठी गर्दी झाली होती. याप्रकरणी खडेबाजार पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.









