ऑनलाईन टीम / तरुण भारत :
झारखंडच्या धनबादमधील हाजरा हॉस्पिटलला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत डॉ. दाम्पत्यासह 6 जणांचा होरळपळून मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धनबादमधील बँकमोड पोलीस स्टेशन हद्दीत हाजरा हॉस्पिटल आहे. मध्यरात्री दोनच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे या हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली. क्षणार्धात आगीने उग्र रुप धारण केले आणि पहिला मजलाही आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. आग लागली तेव्हा डॉ. विकास हाजरा आणि डॉ. प्रेमा हाजरा यांच्यासह हॉस्पिटलमधील कर्मचारी गाढ झोपेत होते. हॉस्पिटलमध्ये 25 रुग्णही होते. धुरामुळे श्वास गुदमरु लागल्याने अनेकांना जाग आली. त्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
अधिक वाचा : प्राचार्यांना मारहाण करणं भोवलं; आ. बांगर यांच्यासह 30 ते 40 जणांवर गुन्हा
घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पाच गाडय़ा पोहचल्या. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी रुग्णालयातील काही जणांना सुखरुप बाहेर काढलं. मात्र, खोल्यांमध्ये खूप धूर असल्याने काहींचा जीव वाचवणे कठीण झाले. काही तासांच्या अथक प्रयत्नांनी अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. दुर्देवाने या आगीत होरपळून हाजरा दाम्पत्यासह 6 जणांचा मृत्यू झाला.









