परिसरातील गावांमध्ये पसरले धुराचे लोट : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
वार्ताहर /उचगाव
तुरमुरी कचरा डेपोला बुधवारी दुपारी लागलेल्या आगीमुळे परिसरातील गावांमध्ये धुरो लोट पसरले हेते. परिणामी या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रचंड दूषित धुरामुळे अनेकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाडय़ांया मदतीने जवळपास तीन ते चार तास लागून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू होता. तुरमुरी कचरा डेपो उंचावर असल्याने आगीमुळे धूर सर्वत्र पसरत होता. तुरमुरी, उचगाव, बसुर्ते, कोनेवाडी, कल्लेहोळ, सुळगा, गोजगे या गावांमध्ये धुराचे लोट पसरले होते. यामुळे सूर्याची किरणेदेखील दिसत नव्हती. इतका प्रचंड धूर या लागलेल्या आगीतून निर्माण झाला होता. तुरमुरी कचरा डेपोवर बुधवारी दुपारच्या दरम्यान आकस्मात आग लागली. ती पेटत संपूर्ण कचरा डेपोला लागली. यामुळे येथील कर्मचाऱयांना आग विझविणे कठीण झाल्याने अग्निशमन दलाच्या अनेक गाडय़ा बोलावून संध्याकाळी सात वाजेपर्यंत आग विझविण्याचा प्रयत्न सुरू होता. या आगीमुळे जवळपासच्या अनेक शेतवडीतील भाजीपाला, ऊस याचबरोबर बागायतीमधील आंबा, काजू, चिकू, पेरू या फळांवरसुद्धा याचा परिणाम होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. शेतकऱयांमधून पिकांनाही धोका निर्माण झाल्याचे बोलले जात होते.









