मिरज :
मिरज एमआयडीसी परिसरात बेथेस्दा स्कुलजवळ शंभर फुटी रस्त्यावर असलेल्या प्लास्टीक साहित्यांच्या गोदामाला मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत प्लास्टीक पिशव्या, कागद, रबर बंडल, पीयुपीच्या पाईप आदी सुमारे दहा लाख ऊपयांचे साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन विभागाच्या मिरज आणि कुपवाड एमआयडीसी येथील सात बंबांसह जवानांनी आगीच्या ठिकाणी धाव घेऊन मोठ्या प्रमाणात पाणी फवारणी केली. आगीची तीव्रता आणि धुराचे लोट प्रचंड असल्याने आग नियंत्रणात आणण्यात अडथळे येत होते. अखेर दीड तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नाही.

घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, मिरज एमआयडीसी येथे शाहिद रशिद मुजावर यांचा प्लास्टीकचा व्यवसाय असून, शंभर पुटी रस्त्यावर साहित्य ठेवण्यासाठी गोदाम आहे. या गोदामात त्यांनी प्लास्टीक पिशव्या, ताडपत्री, रबर बंडल, पीयुपी पाईपासंह बहुतांशी प्लास्टींक भंगार साहित्य ठेवले होते. मंगळवारी सकाळपासून गोदाम बंद होते. दुपारी अडीचच्या सुमारास गोदामाच्या पत्र्यातून काळपट धुर येत असल्याचे काहींना दिसले. मात्र, गोदाम बंद असल्याने आत आग लागल्याचे निदर्शनास आले नव्हते.
प्रचंड उन्हाच्या झळा आणि गोदामात पेटलेले प्लास्टीक यामुळे बघता बघता आगीचे लोण पसरत गेले. काही वेळानंतर आगीने रौद्रऊप धारण केले. आकाशाला भिडणारे धुराचे आणि आगीचे लोट बाहेर येत होते. गोदाम मालक मुजावर यांना माहिती मिळताच त्यांनी अग्निशमन विभागाला कळविले. अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी सुनिल माळी यांनी मिरज शहर विभागातील सहा आणि कुपवाड एमआयडीसी विभागातील एक असे सात बंब पाचारण केले. अग्निशमन विभागाचे माळी यांच्यासह विजय पवार, सागर गायकवाड, विनोद मगदूम, इकबाल मुल्ला, बाळासो पुणेकर, जावेद मुश्रीफ, राजेंद्र कदम, विजय कांबळे, प्रसाद माने, अण्णासो देशमुख, उमेश सरवदे, धीरज पावणे या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. एकाचवेळी सात बंबातून पाणी फवारले जात होते. प्लास्टीक साहित्य जळून वितळलेले प्लास्टीक पाण्यात पसरल्यामुळे जवानांना आग आटोक्यात आणण्यात अनेक अडथळे येत होते. सुमारे दीड तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले.
दरम्यान, गोदामात विद्युत कनेक्शनच नव्हते. त्यामुळे ही आग नेमकी कशामुळे लागली? याचा अंदाज लावणे कठीण बनले आहे. सदर प्लास्टीक गोदामालगतच वाळलेल्या झाडांचा पालापाचोळा होता. अज्ञातांनी कचरा पेटविल्यामुळे कारखान्याला आग लागली असल्याचा संशय गोदाम मालक शाहिद मुजावर यांनी व्यक्त केला आहे. सुमारे आठ ते दहा लाखांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. कारखान्यात विद्युत कनेक्शन नसल्यामुळे शॉर्टसर्किट होण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे कारखान्यात आग लागली की कोणी लावली? असा संशय आहे. मुजावर यांनी गांधी चौकी पोलिसात तक्रार दिली असून, रात्री उशिरापर्यंत नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू होते.
- आग मिरजेत, धुर कुपवाडात
मिरजेत शंभर फुटी रस्त्यावरील गोदामात लागलेल्या आगीचे आकाशाला भिडणारे धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होते. सर्वच प्लास्टीक साहित्य पेटल्यामुळे काळाकुट्ट धुराचा डेंब उसळला होता. कुपवाड एमयडीसीपासून सांगली रस्त्यावरील सिनर्जी हॉस्पिटलपर्यंत आणि पंढरपूर रस्त्यावरील सिव्हील हॉस्पिटलपर्यंत धुराचे मोठ–मोठे लोट दूरदूरवऊन नजरेस पडत होते. ही आग एमआयडीसीतीलच मोठ्या कारखान्याला लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात होता. धुराचे डोंब पाहून धडकी भरलेल्यांनी आग पाहण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली होती.
- अशी आग पाहिली नाही
आगीची तीव्रता पाहून आम्हालाही धडकी भरली. कुपवाड आणि मिरजेतील एकूण सात बंबासह सर्वच कर्मचाऱ्यांना आग आटोक्यात आणण्यासाठी पाचारण केले. माझ्या नोकरीच्या कारकीर्दीत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात आग लागल्याची घटना बघितली. गोदामात विद्युत कनेक्शन नव्हते. आग लागण्याचे नेमके कारण समजले नाही. उन्हाळाच्या दिवसात आगीच्या घटनांपासून सावधनता बाळगावी.
सुनिल माळी ,अग्निशमन मुख्य अधिकारी.








