शेतकऱ्यांचा आरोप, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : कणबर्गी येथील जमिनीमध्ये 61 क्रमांक स्कीम 2007 साली राबविण्यासाठी सर्व्हे करण्यात आला होता. मात्र शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला. त्यानंतर बुडाने दडपशाही करत शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी काही रिअल इस्टेटधारकांनी बेकायदेशीर जमिनी खरेदी केल्या आहेत. त्याला बुडानेच सहकार्य केले आहे. यामध्ये बुडाचे आयुक्त प्रितम नसलापुरे यांनी गैरप्रकार केला आहे. तेंव्हा त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी श्री सिद्धेश्वर शेतकरी संघटना रयत संघ, कणबर्गी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बुडा येथील 160 एकर जमीन सर्व्हे करण्यात आली होती. त्यामधील 65 एकर जमीन बेकायदेशीर खरेदी करण्यात आली आहे. त्यामध्ये जवळपास 150 ते 300 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. सध्या हा खटला देखील न्यायालयात प्रलंबित आहे. अनेक शेतकऱ्यांना न्यायालयाने स्थगिती दिली आहे. असे असताना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न बुडा आयुक्त प्रितम नसलापुरे यांनी केला आहे, असा आरोप देखील निवेदनात करण्यात आला. बुडा आयुक्तांची इतरत्र बदली झाली होती. तरीदेखील ते त्या ठिकाणी ठाण मांडून आहेत. त्यामागचे गौडबंगाल काय? असा प्रश्नदेखील उपस्थित करण्यात आला आहे. यावेळी बबन मालाई, महादेव मालाई यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. बुडा आयुक्त कार्यालयासमोरही शेतकऱ्यांनी धरणे धरले. याचबरोबर आमदार अनिल बेनके यांच्या घरीही जाऊन त्यांना निवेदन दिले आहे.









