बांगलादेशात मोठ्या प्रमाणात जाळपोळ : सरन्यायाधीशांच्या निवासस्थानावरही हल्ला
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशात विरोधी पक्षाच्या मोर्चादरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसा झाली आहे. यानंतर विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनल पार्टीच्या (बीएनपी) कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत झटापट झाली असून यात एका पोलीस अधिकाऱ्याला जीव गमवावा लागला आहे. या हेंसेत सुमारे 100 जण जखमी झाले आहेत. बांगलादेशात जानेवारी महिन्यात निवडणूक होणार असल्याने बीएनपीकडून पंतप्रधान शेख हसिना यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. एक काळजीवाहू सरकार स्थापन करण्यात यावे असे बीएनपीचे म्हणणे आहे.
मागील 45 महिन्यांमधील हे सर्वात मोठे निदर्शन ठरल्याचे बोलले जात आहे. विरोधी पक्षांच्या मोर्चादरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसा झाली आहे. सरन्यायाधीश ओब्wदुल हसन यांच्या निवासस्थानावरही हल्ला झाला आहे. सुरक्षा दलांनी समाजकंटकांवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केल्याने अनेक ठिकाणी हिंसक झटापट झाली आहे.
बीएनपी आणि जमात-ए-इस्लामीच्या 1 लाखाहून अधिक समर्थकांनी ढाका येथे सभा घेतली आहे. बीएनपीकडून रविवारी देशभरात बंद पुकारण्यात आला. विरोधी पक्षांच्या मोर्चादरम्यान सत्तारुढ अवामी लीगने बैतुल मुकर्रममध्ये शांतता रॅलीचे आयोजन केले होते.
अवामी लीगच्या कार्यकर्त्यांना बीएनपीच्या कार्यकर्त्यांनी रोखल्यानंतर हिंसेस सुरुवात झाली. यानंतर पोलिसांनी कारवाई केल्याने बीएनपी कार्यकर्त्यांकडून जाळपोळ करण्यात आली. ककरैल, नयापलटन, विजयनगर, मालीबाग, आरामबाग भाग येथे झालेल्या झटापटींदरम्यान किमान 13 वाहने आणि एक पोलीस चौकीला आगीच्या हवाली करण्यात आले. तर शेकडो वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. हिंसेदरम्यान पोलिसांनी निदर्शकांवर अश्रूधूर आणि रबर शॉटगनचा देखील वापर केला. तर निदर्शकांनी पोलिसांवर दगडफेक केली आहे.
यापूर्वी जुलै महिन्यात विरोधी पक्षांनी पंतप्रधान हसिना यांच्या राजीनाम्याची मागणी करत रॅली काढली होती. यादरम्यान राजधानी ढाकामध्ये हजारोंच्या संख्येत लोक रस्त्यांवर उतरले होते. त्यावेळी झालेल्या हिंसेत एकाचा मृत्यू झाला होता. तर शेकडो जण जखमी झाले होते.
जानेवारी महिन्यात निवडणूक
बांगलादेशात जानेवारी महिन्यात सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. पंतप्रधान शेख हसिना यांनी याची घोषणा केली आहे. हसिना या 2009 पासून बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत. तसेच सलग पाचव्यांदा त्या पंतप्रधानपदाच्या दावेदार आहेत. विरोधी पक्ष बीएनपीचे नेते मनी लॉन्ड्रिंगद्वारे देशाचा पैसा विदेशात पाठवत असून यात माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान यांचाही समावेश असल्याचा आरोप हसिना यांनी केला आहे.









