सुरतमधील घटना, इतरांना विष पाजून कुटुंबप्रमुखाने घेतला गळफास
वृत्तसंस्था/ सुरत
गुजरात सुरतमधील हृदयद्रावक घटनेत एकाच कुटुंबातील सात जणांनी सामूहिक आत्महत्या केली आहे. कुटुंबप्रमुखाने सर्व सदस्यांना विष दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानंतर त्यांनी स्वत: गळफास घेतला. मृतांमध्ये आई-वडील, पत्नी यांच्यासह तीन मुलांचा समावेश आहे. मात्र, या सामूहिक आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
सुरतमधील एका संपूर्ण कुटुंबाने विष प्राशन करून सामूहिक आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघड झाला. कुटुंबियांना विष पाजल्यानंतर येथील शांतीलाल सोळंकी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सुरतच्या पालनपूर भागात घडली. या घटनेने सुरतमधील रहिवाशांना धक्का बसला आहे अडाजन येथील पालनपूर पाटिया येथील सिद्धेश्वर अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. शांतीलाल सोळंकी यांनी प्रथम पत्नी, आई, वडील आणि तीन मुले अशा कुटुंबातील सर्व सहाही सदस्यांना विष प्राशन करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांनी स्वत: अपार्टमेंटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस व वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
या घटनेने पालनपूर पाटिया येथे राहणाऱ्या नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी नवीन सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवले आहेत. कुटुंब आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी शेजारी आणि परिसरातील इतर लोकांची चौकशी सुरू केली आहे. या सामूहिक आत्महत्येमागील हेतू अद्याप कोणालाच माहीत नाही. मात्र, पोलीस आर्थिक समस्या, कौटुंबिक वाद यासह सर्व बाबींचा तपास करत आहेत









